बसाप्पाचीवाडी-डफळापुरात पाणीप्रश्नावरून संघर्ष पेटला
By admin | Published: January 14, 2015 10:27 PM2015-01-14T22:27:15+5:302015-01-14T23:19:05+5:30
समझोत्याची गरज : सहा दिवसात दोन वेळा काम बंद
डफळापूर : डफळापूर (ता. जत) राष्ट्रीय पेयजल योजनेत राजकीय हस्तक्षेप वाढला आहे. ही योजना होऊ नये म्हणून बसाप्पाचीवाडी ग्रामस्थांचा होत असलेला तीव्र विरोध, कवठेमहांकाळ पोलिसांची बघ्याची भूमिका, बसाप्पाचीवाडी ग्रामस्थांची मानसिकता बदलण्याची गरज, तसेच डफळापूर ग्रामस्थांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याची आवश्यकता असताना, दोन्ही गावात संघर्ष वाढतच चालला आहे.डफळापूरसाठी २0११ मध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेतून बसाप्पाचीवाडी तलावातून नळपाणी पुरवठा योजनेसाठी साडेसात कोटी रुपयांची योजना मंजूर झाली. या योजनेला निधी देण्यास शासनाने सुरुवातीपासून टाळाटाळ केली. असे असताना ठेकेदाराने आतापर्यंत पावणेतीन कोटीची कामे केली आहेत. गेल्या आठवड्यात डफळापूर योजनेचे काम बसाप्पाचीवाडी तलावात पोलीस बंदोबस्तात करण्यात आले. सहा दिवसात दोन वेळा बसाप्पाचीवाडी येथील काही ग्रामस्थांनी काम बंद पाडले. डफळापूर योजना होऊ नये म्हणून बसाप्पाचीवाडी येथील ग्रामस्थ विरोध करीत आहेत. डफळापूरकरांची तहान भागविण्यासाठी बसाप्पाचीवाडी गावच्या ग्रामस्थांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. डफळापूर योजनेतून पाणी गाव व वाडी-वस्तीसाठी जात नसून ते पाणी शेतीसाठी जात असल्याच्या अफवा उठवल्या जात आहेत. दोन्ही गावांचा संघर्ष विकोपाला जाऊ नये यासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा पोलीसप्रमुख यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)
दोन संशयित ताब्यात
डफळापूर पाणी योजनेचे काम बंद पाडणाऱ्या बसाप्पाच्यावाडी येथील भारत ज्ञानदेव ओलेकर व दिलीप विलास लोखंडे यांना कवठेमहांकाळ पोलिसांनी आज (बुधवारी) ताब्यात घेतले. अन्य दोन संशयितांचा शोध सुरू आहे.