सांगली जिल्ह्यातील बसाप्पाचीवाडी तलाव २२ वर्षांनी भरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 03:41 PM2019-11-21T15:41:21+5:302019-11-21T15:41:46+5:30
याचे सविस्तर वृत्त लोकमतने दिले होते. यानंतर शिवसेना युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख अमित दुधाळ, शासकीय कर्मचारी, शेतकऱ्यांनी दरवाजाची गळती तात्पुरती बंद केली.
डफळापूर : बसाप्पाचीवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील मध्यम प्रकल्प तलाव तब्बल २२ वर्षांनी शंभर टक्के भरला. यामुळे तलावावर अवलंबून असलेल्या सात गावांतील शेतकरी व ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे.
गत महिन्यात बसाप्पाचीवाडी परिसरात मुसळधार पावसामुळे ओढ्यांचे प्रचंड प्रमाणात पाणी या तलावात येऊ लागले; परंतु या तलावाच्या मुख्य कालव्याच्या नादुरुस्त दरवाजामुळे लाखो लिटर पाणी वाया जात होते. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने शेतकरी वर्गातून संतप्त प्रतिक्रिया उमटली. याबाबत जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिला. याचे सविस्तर वृत्त लोकमतने दिले होते. यानंतर शिवसेना युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख अमित दुधाळ, शासकीय कर्मचारी, शेतकऱ्यांनी दरवाजाची गळती तात्पुरती बंद केली.
कवठेमहांकाळ व जत तालुक्याच्या सीमेवर बसाप्पाचीवाडी येथे मध्यम प्रकल्प मोठा तलाव आहे. या तलावावर बसाप्पाचीवाडी, अंकले, कोकळे, डोर्ली, मोघमवाडी, इरळी, डफळापूर आदी गावे अवलंबून आहेत. मागील उन्हाळ्यात म्हैसाळ योजनेच्या पाण्याअभावी शेतकऱ्यांचे प्रचंड हाल झाले. आता निसर्गाच्या कृपेमुळे हा तलाव भरल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.