Sangli: माळीण, वायनाड झाले; उद्या भाष्टेवस्ती, कोकणेवाडी नको
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 01:31 PM2024-08-01T13:31:00+5:302024-08-01T13:33:11+5:30
२०१९ पासून पुनर्वसनाचा प्रश्न रेंगाळला
विकास शहा
शिराळा : शिराळा तालुक्यातील चांदोली परिसरातील आरळापैकी, भाष्टेवस्ती तसेच कोकणेवाडी ही वस्ती माळीण, वायनाडसारख्या दुर्घटनेच्या छायेखाली असून, वाडीलगतच्या डोंगरांना भेगा पडून डोंगर खचू लागले आहेत. अतिवृष्टी झाली तर याठिकाणी मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
शासनाकडून येथील नागरिकांचे कायमस्वरूपी स्थलांतर होणार का? अशीच परिस्थिती पश्चिम भागातील अनेक वाड्या-वस्त्यांवर आहे. माळीण, वायनाडसारख्या घटनेचे सावट आणि भीती येथील नागरिकांत आहे. स्थलांतरासाठी जागा निवडल्या. सर्वकाही प्रस्ताव पाठवण्यात आला आणि त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी स्थलांतराच्या ठिकाणी किती खर्च येणार याचे अंदाजपत्रक मागितले आहे. आता स्थलांतराचा चेंडू पंचायत समितीकडे आहे; मात्र प्रत्येकाला जागा कोठे, किती देणार? याचे नियोजन नाही, आर्किटेक्ट नेमणूक त्यानंतर प्रस्ताव, मंजुरी आदी यामुळे स्थलांतरही रेंगाळले आहे.
याठिकाणी भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पहाणी केली असून, कोकणेवाडी येथील डोंगर केव्हाही ढासळू शकतो, असा निष्कर्ष काढला होता. याबाबत वरिष्ठ कार्यालयास ११ नोव्हेंबर २०१९ला माहितीही कळविली होती. या प्रश्नाबाबत आमदार मानसिंगराव नाईक, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या वारंवार याबाबत बैठक झाल्या. यानंतर जिल्हाधिकारी दयानिधी यांनी जागेची निवड करून पाहणी करावी, असे सांगितले. यानंतर प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, अमित रंजन गुप्ता, तहसीलदार शामला खोत-पाटील, प्रशिक्षणार्थी तहसीलदार संतोष आठरे यांनी भेट देऊन पाहणी केली होती.
स्थलांतरासाठी जागा पाहणी झाली याबाबत प्रस्ताव पाठविला. प्रस्ताव पाठविल्यानंतर आराखडा व खर्चाचे अंदाजपत्रक करून पाठविण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी तहसीलदारांना कळविले. यावरून तहसीलदार शामला खोत-पाटील यांनी पंचायत समितीकडे याबाबत प्रस्ताव करावा, असे कळविले आहे. या नागरिकांना किती जागा देणार, सोईसुविधा कशा द्यायच्या अशा अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे हे पुनर्वसन रेंगाळले आहे. २०१९ पासून पुनर्वसनाचा प्रश्न रेंगाळला आहे. माळीण झाली, आज वायनाड झाले अशी घटना येथे घडली तर काय? अशा भीतीच्या छायेखाली येथील नागरिक वावरत आहेत.
शिराळा पश्चिम भागात भूस्खलनाचे संकट
तालुक्याच्या पश्चिम भागातील मिरुखेवाडी, कोकणेवाडी, भाष्टेवाडी, काळोखेवाडी, सावंतवाडी, भिसेवाडी या डोंगराच्या पायथ्याला तर जाधववाडी ढाणकेवाडी, सावंतवाडी, येसलेवाडी, गुंडेवाडी या डोंगर पठारावर वसलेल्या वाड्या-वस्त्या आहेत. जळकेवाडी, बेर्डेवाडी, खोतवाडी परिसरातही थोड्याफार फरकाने अशीच परिस्थिती आहे. या ठिकाणी दरवर्षी तीन ते पाच हजार मिलिमीटर पाऊस पडतो. दोन-तीन वर्षांपासून येथे पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे भूस्खलनाचे संकट आहे.
पुनर्वसन होणारे कुटुंब व लोकसंख्या
-कोकणेवाडी कुटुंब १०१ (पुरुष-१५२, स्त्री १५४) एकूण ३०६
-भाष्टेवस्ती-कुटुंब २८ (पुरुष -३८, स्त्री ३८) एकूण ७६
-धामणकरवस्ती -कुटुंब १८ (पुरुष-२४, स्त्री २९) एकूण ५३
-मिरुखेवाडी - कुटुंब ११९ (पुरुष १८० महिला १७३ ) एकूण एकूण ३५२