धान्याची आधारभूत किंमत कागदावरच!

By admin | Published: December 11, 2014 10:44 PM2014-12-11T22:44:23+5:302014-12-11T23:41:01+5:30

व्यापाऱ्यांकडून कमी दराने खरेदी : पाचशे रुपयांचा गाळा मारला जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप

The basic price of the grain on paper! | धान्याची आधारभूत किंमत कागदावरच!

धान्याची आधारभूत किंमत कागदावरच!

Next

दिलीप मोहिते - विटा वर्षभर ऊन, वारा, पाऊस, वादळाचा सामना करून शेतकऱ्यांनी पिकविलेल्या धान्यासाठी शासनाने जाहीर केलेली आधारभूत किंमत केवळ कागदावरच असून, खासगी व्यापाऱ्यांना आधारभूत किमतीने धान्य खरेदीचा आदेश दिला असला तरी, धान्य व्यापाऱ्यांनी मनमानी करीत आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने धान्य खरेदी करण्याच्या शासनाच्या आदेशालाच केराची टोपली दाखविल्याचे समजते. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली आधारभूत किंमत केवळ शेतकऱ्यांच्या समाधानासाठीच असल्याची तिखट प्रतिक्रिया उमटू लागली असून, व्यापाऱ्यांनी धान्य खरेदीत शेतकऱ्यांची खुलेआम लूट सुरू केल्याची तक्रार शेतकरी करीत आहेत.
शासनाने शेतकऱ्यांच्या मालाला किफायतशीर व योग्य भाव मिळवून देण्यासाठी खरीप व रब्बी हंगामातील ज्वारी, बाजरी, मका, तूर, उडीद, कापूस, सोयाबीन, मूग, हरभरा, गहू या धान्याची आधारभूत किंमत जाहीर केली. खरीप व रब्बी हंगामातील धान्य शासनाने ठरवून दिलेल्या आधारभूत किमतीलाच खरेदी करण्याच्या सूचना धान्य व्यापाऱ्यांना दिल्या. त्यासाठी सहकारी संस्थांच्या सहायक निबंधकांनीही प्रत्येक तालुक्यात धान्य खरेदी-विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांची व्यापक बैठक घेऊन, धान्य खरेदीत शेतकऱ्यांवर अन्याय केल्यास कारवाईचाही इशारा दिला होता.
परंतु, विटा शहरासह खानापूर तालुक्यातील छोट्या-मोठ्या धान्य व्यापाऱ्यांनी शासनाच्या आधारभूत किमतीच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचा प्रकार उजेडात येत आहे. विटा कृषी उत्पन्न बाजार समितीत सहायक निबंधक अनिल डफळे यांनी व्यापाऱ्यांची बैठक घेऊन, शासनाने ठरवून दिलेल्या आधारभूत किमतीतच धान्य खरेदी करावे, अन्यथा संबंधित व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. परंतु, या बैठकीतील ‘साहेबांचे’ आदेश व सूचना व्यापाऱ्यांनी एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देऊन, शासनाच्या आदेशाला ठेंगा दाखविला आहे. त्यामुळे धान्य खरेदी केंद्र सुरू केलेल्या विटा कृषी उत्पन्न बाजार समिती सोडून अन्य ठिकाणी खासगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना आधारभूत किंमत मिळत नसल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे शासनाने ठरवून दिलेली आधारभूत किंमत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या हाती मिळणार का? असा प्रश्न यानिमित्ताने शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

शेतीमालाची आधारभूत किंमत (प्रति क्विंटल)
हरभरा : ३ हजार १०० रुपये
मका : १ हजार ३१०
तूर : ४ हजार ३५०
उडीद : ४ हजार ३५०
ज्वारी : १ हजार ५३०
ज्वारी मालदांडी : १ हजार ५५०
बाजरी : १ हजार २५०
कापूस मध्यम : ३ हजार ७५०
कापूस लांब धागा : ४ हजार ५०
मूग : ४ हजार ६००
सोयाबीन काळा : २ हजार ५००
सोयाबीन पिवळा : २ हजार ५६०
या दराने शासनाकडून धान्य खरेदीची आधारभूत किंमत ठरविण्यात आली असली तरी, खासगी धान्य व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांचा शेतीमाल आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने खरेदी होत असल्याच्या तक्रारी आहेत.

Web Title: The basic price of the grain on paper!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.