जत पूर्वच्या द्राक्ष, डाळिंब बागांना टॅँकरचाच आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 07:25 PM2019-06-06T19:25:46+5:302019-06-06T19:26:23+5:30
जत पूर्व भागात यंदाच्या डाळिंब व द्राक्ष हंगामात सुरुवातीपासूनच टँकरने पाणी द्यावे लागत आहे. पूर्वी २० हजार लिटर पाण्याचा टँकर अडीच हजार रुपयांना मिळायचा, तोच टॅँकर सध्या साडेतीन हजार रुपये झाला आहे. दर वाढला असला, तरी बागांना टॅँकरच्या पाण्यामुळे आधार मिळाला आहे.
गजानन पाटील
संख : जत पूर्व भागात यंदाच्या डाळिंब व द्राक्ष हंगामात सुरुवातीपासूनच टँकरने पाणी द्यावे लागत आहे. पूर्वी २० हजार लिटर पाण्याचा टँकर अडीच हजार रुपयांना मिळायचा, तोच टॅँकर सध्या साडेतीन हजार रुपये झाला आहे. दर वाढला असला, तरी बागांना टॅँकरच्या पाण्यामुळे आधार मिळाला आहे.
पावसाने दडी दिल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. एकरी खर्चात दुप्पट वाढ झाली आहे. द्राक्ष, डाळिंब बागा धोक्यात आल्या आहेत. उत्पादन काहीच मिळणार नसल्याने बागायतदार आर्थिक संकटात सापडला आहे. जत तालुक्यात द्राक्षाचे क्षेत्र ४ हजार ८७० हेक्टर, डाळिंबाचे क्षेत्र ११ हजार ३४४.५९ हेक्टर आहे.
तालुक्यात गेल्यावर्षी पाऊस झाला नसल्याने द्राक्ष, डाळिंब बागा अडचणीत आल्या आहेत. यावर्षी पाणी कमी असल्याने पावसाच्या भरवशावर द्राक्ष बागा व डाळिंब बागांचा बहर धरला होता; परंतु परतीचा पाऊस न झाल्याने कूपनलिका, विहिरी कोरड्या पडल्या आहेत. सध्या दरीबडची, सिध्दनाथ, उमदी परिसरातील शेतकरी टॅँकरचे पाणी घालून बागा जगवत आहेत.
पूर्व भागातील उमदी, सिध्दनाथ परिसरातील बागायतदार बेदाणा, द्राक्षाचे दर्जेदार उत्पादन घेतो, तर डाळिंबाचे दरीबडची परिसरात दर्जेदार उत्पादन घेतले जाते. पाणी नसल्याने डाळिंब व द्राक्ष बागा अडचणीत आल्या आहेत. शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
तालुक्यातील पश्चिम, दक्षिण व उत्तर भागात म्हैसाळ योजनेचे पाणी आले आहे, परंतु पूर्व भागातील ६५ गावे अद्याप पाण्यापासून वंचित आहेत. तालुक्यात सध्या पिण्याच्या पाण्याची, जनावरांच्या पाण्याची व चाऱ्यांची भीषण टंचाई निर्माण झाली आहे.
गेल्या चार वर्षांपासून पर्जन्यमान कमी झाले आहे. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली आहे. सध्या मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथून टॅँकरने पाणी आणून बागांना दिले जात आहे. दरीबडची परिसरातील शेतकऱ्यांना टॅँकर भरायलाही पाणी नाही. कूपनलिका, तलाव शेजारी असलेल्या विहिरीतून पाणी भरले जात आहे. त्यामुळे बागा जगवणे जिकिरीचे बनले आहे.
द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना वर्षभर एकरी एक ते दोन लाख खर्च येतो. या खर्चात टॅँकरमुळे दुप्पट वाढ झाली आहे. पाणी पुरेसे नसल्याने उत्पन्नही घटत आहे. बेदाण्याला बाजारात कमी दर मिळत आहे. यामुळे आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.