शेट्टी-खोत यांच्यात अस्तित्वाची लढाई : इस्लामपुरातील चित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 02:02 AM2018-02-25T02:02:55+5:302018-02-25T02:02:55+5:30
अशोक पाटील
इस्लामपूर : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतकरी चळवळीसाठी रयत क्रांती संघटनेचा झेंडा खांद्यावर घेऊन भाजपची शाल पांघरली आहे, तर खासदार राजू शेट्टी स्वाभिमानी संघटना पुन्हा शेतकºयांच्या बांधावर नेऊन काँग्रेस-राष्ट्रवादीला खुणावत आहेत. या दोघांनी आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवली आहे. शेट्टी-खोत अस्तित्वासाठी चळवळीचे झेंडे गुडघ्याला बांधून एकमेकांवर दगडाचा मारा करत आहेत.
खा. शेट्टी यांनी गत लोकसभा निवडणुकीत भाजपच्या आघाडीत सामील होऊन स्वत:साठी हातकणंगले आणि सदाभाऊ खोत यांच्यासाठी माढा लोकसभा मतदारसंघ मागून घेऊन आघाडी काँग्रेसविरोधात निवडणूक लढवली. त्यावेळी या दोघांनीही निवडणूक खर्चासाठी शेतकºयांकडून मदत गोळा केली. नंतर मात्र ते भाजपच्या सत्तेत जाऊन बसले. भाजपला मात्र शेतकºयांचा विसर पडला म्हणूनच नगर जिल्ह्यातील शेतकºयांनी शेतमालाच्या दरवाढीसाठी संप पुकारून चळवळीला नवीन दिशा दिली. हा संप फोडण्याच्या प्रक्रियेत खोत बदनाम झाले. त्यानंतर शेट्टी यांनी शेतकºयांचा बांध गाठून भाजप सरकारविरोधात एल्गार पुकारला. मंत्रीपद धोक्यात येईल म्हणून खोत यांनी खांद्यावर भाजपची शाल घेऊन रयत क्रांती संघटना उभी करून खासदार शेट्टी यांनाच आव्हान दिले.
आता आगामी लोकसभेसाठी शेट्टींविरोधात खोत यांनी संपर्क वाढवून चाचपणी सुरू केली आहे. तिकडे माढा मतदारसंघात शेट्टी यांचे खंदे समर्थक रविकांत तूपकर यांनी संपर्क वाढवून खोत यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. यामुळे खोत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ताकद घेऊन शेट्टी-तूपकर यांच्याविरोधात लोकसभेच्या निवडणुकीचे रणांगण सुरू होण्याअगोदर नांगरट सुरू केली आहे. यातूनच शेट्टी-खोत संघर्ष पेटला आहे. याचा श्रीगणेशा सोलापूर जिल्ह्यातून झाला. एका शेतकºयाने खोत यांच्यावर चिखलफेक केली होती. त्यावर खोत यांच्या कार्यकर्त्यांनी इस्लामपूर पोलिसात तक्रार केली तर, आता खोत यांच्या गाडीवर सोलापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. त्याचे पडसाद इस्लामपुरात उमटले. खोत यांच्या कार्यकर्त्यांनी ‘स्वाभिमानी’चे कार्यालय फोडून शेट्टी यांच्या पुतळ्याचे दहन केले.
शेट्टी-खोत एकत्रितपणे शेतीमालाच्या दरासाठी सरकारविरोधात लढत होते. या लढ्यात दोघांनीही पोलिसांच्या काठ्या खाल्ल््या आहेत. आता मात्र शेट्टी-खोत स्वत:च्या अस्तित्वासाठी एकमेकांवर दगडफेक करत आहेत.