कृष्णेच्या रणांगणात वाळवा तालुक्यात खलबते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:21 AM2021-05-30T04:21:59+5:302021-05-30T04:21:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिरटे : यशवंतराव मोहिते कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. गटातटाच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरटे : यशवंतराव मोहिते कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. गटातटाच्या राजकारणात कार्यकर्त्यांतून मानापमान नाट्य सुरू झाले आहे. रेठरे हरणाक्ष व येडेमच्छिंद्र गटातील राष्ट्रवादीचे अविनाश मोहिते यांचे काही कार्यकर्ते नाराज असून, ते वेगळा विचार करण्याच्या पावित्र्यात आहेत. ही माहिती वाळवा तालुक्यातील एका राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.
संस्थापक पॅनेलचे नेते अविनाश मोहिते यांचे निष्ठावंत कार्यकर्ते हे वाळवा तालुक्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत. नरसिंहपूर, भवानीनगर व रेठरे हरणाक्ष येथील पदाधिकाऱ्यांची नुकतीच गुप्त बैठक झाली आहे. यामध्ये अविनाश मोहिते यांच्याकडून डावलले जात आहे. संपर्क ठेवला जात नाही, यावर खलबते झाली.
संस्थापक पॅनेलकडून दुजाभाव केला तर येत्या काही दिवसांत सर्वांनी मिळून अविनाश मोहिते यांच्याशी चर्चा करायची. यातूनही काही निष्पन्न झाले नाहीतर वेगळा विचार करण्याचे सर्वांचे ठरले आहे. गोपनीय बैठकीला सांगली जिल्ह्याचे नेतृत्व करणारे एक पदाधिकारी व वाळवा तालुक्याच्या राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित असल्याचे समजते.
काही दिवसांपूर्वीच कोळेचे सरपंच आबासाहेब पाटील, शिरटेचे प्रशांत रणदिवे, उद्योजक अनिल पाटील, बिचूदचे हरिभाऊ सावंत व त्यांचे कार्यकर्ते, आदी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी भोसले गटात प्रवेश केला होता. त्यामुळे अविनाश मोहिते यांच्या गटातील कार्यकर्ते काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.