consumer day : हक्काबाबत जागृत रहा, हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करा : मुकुंद दाते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 04:28 PM2019-12-25T16:28:54+5:302019-12-25T16:47:47+5:30
समाजामध्ये वावरत असताना कोठेही घाबरू नये. आपल्या हक्काबाबत जागृत रहावे. आपले हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच सांगलीचे अध्यक्ष मुकुंद दाते यांनी केले.
सांगली : समाजामध्ये वावरत असताना कोठेही घाबरू नये. आपल्या हक्काबाबत जागृत रहावे. आपले हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच सांगलीचे अध्यक्ष मुकुंद दाते यांनी केले.
राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय सांगली येथे आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे, सायबर शाखेचे सहायक पोलीस निरिक्षक गजानन कांबळे, निर्भया पथकाच्या नोडल अधिकारी सहायक पोलीस निरिक्षक प्रज्ञा देशमुख, श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयाचे प्राचार्य आर. जे. कुलकर्णी, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य डॉ. ज्ञानचंद्र पाटील आदि मान्यवर व्यासापीठावर उपस्थित होते.
यावेळी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच सांगली चे अध्यक्ष मुकुंद दाते यांनी ग्राहक तक्रार निवारण मंचच्या कार्यपध्दतीविषयी सविस्तर माहिती देऊन कोणत्याही पध्दतीच्या अत्याचारापासून कसे संरक्षण करावे या विषयी मार्गदर्शन केले.
महिलांवर होणारे अत्याचार, उपाययोजना व कायदेशीर तरतुदीबाबत मार्गदर्शन करताना सहायक पोलीस निरिक्षक प्रज्ञा देशमुख म्हणाल्या, मुलींनी शिक्षणापासून लक्ष विचलीत होऊ देवू नये, फसवणूक होऊ नये यासाठी काळजी घ्यावी. महिलांच्या सुरक्षिततेसाठी सांगली जिल्ह्यात ७ निर्भया पथके कार्यरत आहेत. १०९१ हा महिला हेल्पलाईन नंबर आहे. छेडछाड झाली तर निर्भया पथकाला कळवावे. त्यानुसार सर्वोतोपरी मदत केली जाईल.
मानसिकरित्या खंबीर असणे आवश्यक असून कोणत्याही परिस्थितीला तोंड दिले पाहिजे. कॉलेज जीवन पुन्हा येत नाही यासाठी योग्य दिशा निवडावी. कष्टाने मिळवलेले यश टिकत असते. पोलीस अधीक्षक कार्यालयात भरोसा सेलच्या माध्यमातून पत्नी-पत्नींमधील मतभेद दूर करण्यासाठी त्यांचे समुपदेशन करून वैवाहिक जीवन सुखी ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचबरोबरच दिशा प्रोजेक्टच्या माध्यमातून बाल गुन्हेगारांना योग्य प्रकारे समुपदेशन करून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्या म्हणाल्या.
सहायक पोलीस निरीक्षक गजानन कांबळे यांनी सायबर क्राईम, फसवणूक व उपाययोजना या विषयी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी फसवणुक टाळण्यासाठी फेसबुक, व्हॉटसॲप, नेटबँकींग हाताळत असताना कशा प्रकारे काळजी घ्यावी याबाबत सखोल मार्गदर्शन केले व गैरवापर टाळण्यासाठी मुलींनी सोशल मिडीयावर फोटो ठेवू नयेत असे आवाहन केले.
डॉ. ज्ञानचंद्र पाटील यांनी ग्राहक चळवळ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच फसवणुकीबध्दल तक्रार कोठे करावी याची माहिती असणे आवश्यक असल्याचे सांगून त्यांनी चाईल्ड हेल्पलाईन १०९८, महिला हेल्पलाईन निर्भया पथक १०९१ तसेच विविध विभागाच्या हेल्पलाईन / टोल फ्री क्रमांकाबाबत माहिती दिली व आपल्या हक्काबाबत जागृत राहाण्याचे आवाहन केले.
प्रास्ताविकात जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी कार्यक्रमाचा हेतू विशद करून ग्राहक जनजागृतीबाबत करण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. स्वागत प्राचार्य आर. जे. कुलकर्णी यांनी केले. आभार डॉ. मंगल माळगे यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. उर्मिला क्षीरसागर यांनी केले.
या कार्यक्रमास जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे शासकीय व अशासकीय सदस्य, श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.