राज्य कोणाच्या हाती द्यायचे ठरवा, शरद पवार यांनी केले आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 01:48 PM2024-10-05T13:48:30+5:302024-10-05T13:49:59+5:30
'पंतप्रधान, गृहमंत्र्यांची फोडा व झोडाची भाषा'
सांगली : लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्री महाराष्ट्रात येऊन दोन पक्ष फोडून टाकण्यास सांगत आहेत. फोडा व झोडाची भाषा करत आहेत. महाराष्ट्रात सत्ता आणण्यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत. अशावेळी सद्सदविवेक बुद्धी जागृत ठेवा. महाराष्ट्र कोणाच्या हातात द्यायचा यासाठी जागरूक राहा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केले.
मिरजेतील संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या डी. व बी. फॉर्मसी कॉलेज इमारतीचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील, युवा नेते रोहित पाटील, अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे, उपाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे, ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे उपस्थित होते.
पवार म्हणाले, देशात नुकतीच लोकसभा निवडणूक झाली. यावेळी भाजपने चारशे पारची घोषणा केली. परंतु चारशे पार म्हणजे देशाचे संविधान बदलण्यासाठीच्या हालचाली आहेत. चारशे पार गेल्यास संविधानावर संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भूमिका काँग्रेस आणि इतरांनी मांडली. सामान्य मतदार व नागरिकांनी याची नोंद घेत योग्य बाजूने मतदानाचा हक्क बजावला. देशावर संविधान बदलण्याची स्थिती येऊ दिली नाही. संविधानाला धक्का देण्याची स्थिती निर्माण होऊ नये यासाठी जागृती केल्यामुळे महत्त्वाच्या संकटातून आपण बाहेर पडलो.
ते पुढे म्हणाले, महाराष्ट्राची निवडणूक १० तारखेला घोषित होण्याची शक्यता आहे. १५ ते १८ ऑक्टोबरला मतदान घेतले जाईल. आता महाराष्ट्र कोणाच्या हातात द्यायचा यासाठी जागरूक राहण्याची गरज आहे. महाराष्ट्र हे देशातील महत्त्वाचे राज्य आहे. केंद्रातील नेत्यांना ते कळल्यामुळे गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात कायम येतात. महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असे त्यांनी भाजप नेत्यांना सांगितले आहे.
पंतप्रधान, गृहमंत्र्यांची फोडा व झोडाची भाषा
पंतप्रधान व गृहमंत्री महाराष्ट्रात येऊन शरद पवार व ठाकरे यांचे पक्ष फोडून टाका सांगतात. फोडा व झोडा अशी भाषा करत आहेत. परंतु हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे. महाराजांनी सन्मान, स्वाभिमान शिकवला. संकटावर मात करण्याची दृष्टी, हिंमत दिली. त्यामुळे महाराष्ट्राचे चित्र अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन शरद पवार यांनी केले.