सावधान! कोरोना आणि डेंग्यूचे हातात हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:31 AM2021-09-24T04:31:43+5:302021-09-24T04:31:43+5:30
संतोष भिसे लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोना आणि डेंग्यूचा फैलाव एकत्रित होत असल्याचे वैद्यकीय क्षेत्राचे निरीक्षण आहे. बऱ्याच ...
संतोष भिसे
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोना आणि डेंग्यूचा फैलाव एकत्रित होत असल्याचे वैद्यकीय क्षेत्राचे निरीक्षण आहे. बऱ्याच बाबतीत दोहोंची लक्षणेही एकसमान असल्याने उपचारांमध्ये विशेष काळजी घ्यावी लागत आहे. मागील दीड वर्ष अवघ्या जगाला वेठीस धरलेला कोरोना विषाणू सातत्याने आपल्या रचनेत बदल घडवत आहे. वेगवेगळ्या रूपांनी पुन्हा-पुन्हा फैलावत आहे. त्याच पद्धतीने आता डेंग्यूचा विषाणूदेखील आपली रचना बदलत असल्याचे तज्ज्ञांना आढळले आहे. डेंग्यूसाठी कारणीभूत असणारे डासदेखील या बदलासाठी कारणीभूत ठरत आहे. दंशानंतर रक्त काढून व रक्त न काढता, अशा दोन्ही प्रकारे डास डेंग्यूचा फैलाव करतात. रक्त न आल्यास दंशावर उपचारांची गरज नसते; पण रक्त आले, तर मात्र डेंग्यू हमखास बळावतो. डेंग्यूचा हा प्रकार त्रासदायी ठरतो. दंश करणारे ५० टक्के डास अशा प्रकारे उपद्रवकारक ठरतात, असे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे.
रक्तातील प्लेटलेटस्चे प्रमाण कितीपर्यंत खालावते यावर डेंग्यूची तीव्रता ठरते; पण डेंग्यूचा विषाणू वेळोवेळी स्वत:मध्ये बदल घडवत असल्याने वैद्यक क्षेत्रही गोंधळले आहे. दीड लाख प्लेटलेटस् हे सामान्य प्रमाण आहे. एक लाखापर्यंत ते खालावले तरी चिंता नसते; पण सध्या दहा हजारपर्यंत प्लेटलेटस् खालावल्या तरी डेंग्यूची निश्चिती होत नाही, असे डॉक्टरांनी सांगितले.
बॉक्स
हे बदल काळजी वाढवणारे
ताप नसतानाही पॉझिटिव्ह
डेंग्यूसाठी कणकण तथा तीव्र ताप ही काही लक्षणे डॉक्टरमंडळी लक्षात घ्यायची. सध्या मात्र ताप नसतानाही डेंग्यू निष्पन्न होत आहे. त्यासाठी प्रयोगशाळेत रक्ततपासणी करावीच लागत आहे.
प्लेटलेटस् कमी नाहीत, तरीही डेंग्यू
रक्तातील प्लेटलेटस्चे खालावलेले प्रमाण हीदेखील डेंग्यूची एक प्रमुख खूण होती, ही धारणादेखील डेंग्यूच्या बदलत्या विषाणूने आता चुकीची ठरवली आहे. अगदी दहा हजारापर्यंत प्लेटलेटस् खालावल्या तरी डेंग्यू असतोच असे नाही.
कोट
डेंग्यू आणि कोरोनाचा हातात हात
पहिल्या लाटेत मलेरिया आणि डेंग्यूचा एकत्र संसर्ग होत असल्याचे तपासण्यांमध्ये आढळले होते. सध्याच्या दुसऱ्या लाटेत कोरोनासोबत डेंग्यूचा फैलाव होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शंका आल्यास दोन्ही चाचण्या करणे योग्य ठरते. एखाद्या रुग्णाच्या रक्तातील प्लेटलेटस्चे प्रमाण दहा हजारपर्यंत खालावले तरी त्याच्यात डेंग्यूची लक्षणे दिसत नाहीत. चाचणी घेऊनच त्याची निश्चिती करावी लागते. डॉक्टरांना संभ्रमात टाकणारे हे डेंग्यूच्या विषाणूचे रूप ठरले आहे.
-डॉ. अजय चौथाई, पॅथॉलॉजिस्ट
पॉइंटर्स
जानेवारी ते ऑगस्ट- १७०
१ ते २२ सप्टेंबर- २७
बुधवारी तपासणीसाठी पाठविलेले नमुने- २