टीव्हीसमोर बसून जेवत असाल तर सावधान; पोटविकार वाढण्याची भीती !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:18 AM2021-06-17T04:18:23+5:302021-06-17T04:18:23+5:30
सांगली : कोरोना महामारीच्या काळात आबालवृद्धांपासून सर्व घरीच आहेत. त्यामुळे मनोरंजनाचे साधन म्हणून मोबाईल किंवा टीव्ही पाहण्याचे मुलांमधील प्रमाण ...
सांगली : कोरोना महामारीच्या काळात आबालवृद्धांपासून सर्व घरीच आहेत. त्यामुळे मनोरंजनाचे साधन म्हणून मोबाईल किंवा टीव्ही पाहण्याचे मुलांमधील प्रमाण वाढत आहे. त्यातच टीव्हीसमोर बसून मुले जेवत असल्याचे प्रकार वाढले आहेत. मात्र, या सवयीमुळे मुलांमध्ये पोटविकार वाढण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. पालकांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
कोरोना काळात अनेक सवयींमध्ये बदल दिसून आला आहे. यात बच्चेकंपनीही मागे नाही. अशा परिस्थितीत मुलांना करमणूक किंवा मनोरंजनाचे साधन म्हणून मोबाईल, लॅपटॉपवर खेळण्याचे किंवा टीव्ही पाहण्याचा कालावधी वाढला. टीव्हीसमोर बसूनच जेवण्याची सवयसुद्धा लागली आहे. घरच्या घरीच असल्याने आई किंवा बाबांकडे फास्ट फूड घेऊन मागायचा हट्टही केला जातो. तो पदार्थही टीव्हीसमोर बसूनच बच्चेकंपनी खात असतात. त्यामुळे त्यांना विकार जडण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. तिखट, मसालेदार किंवा तेलकट पदार्थांनी मुलांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. याकडे पालकांनी जागरूक राहून लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.
चौकट
पोटविकाराची प्रमुख कारणे
लहानसहान कारणांवरून पोटविकार होत असतात; परंतु गेल्या काही महिन्यांपासून घरीच राहून लहान मुलांच्या अनेक सवयी बदलल्या आहेत. टी. व्ही.समोर बसून जेवण करणे किंवा अन्य पदार्थ खात असतील तर पोटविकार वाढेल. तिखट मसालेदार पदार्थही पोटविकाराची प्रमुख कारणे आहेत. याशिवाय जेवताना घाई करणे, चावून-चावून न खाणे, पौष्टिक पदार्थ न खाणे या बाबीही पोटविकाराला कारणीभूत ठरू शकतात, याकडे सातत्याने लक्ष देणे आवश्यक आहे.
चौकट
पोटविकार टाळायचे असतील तर...
लहान मुलांची सवय आपल्याला बदलता येते; परंतु पोटविकाराच्या बाबतीत उशीर करता कामा नये; कारण पोटाचे दुखणे मुलांसाठी कधी-कधी गंभीर बनू शकते. पोटविकार टाळायचे असल्यास मुलांना सात्त्विक आहार देणे योग्य आहे. घरीच केलेला स्वयंपाक व त्यात अतितिखट व जास्त तेलकट पदार्थ नसावेत. आहारात सॅलडचा प्रयोग करावा, जेणेकरून मुलांची पचनक्रिया सहज होईल. याशिवाय फळेही खायला द्यावीत.
कोट
टीव्ही, मोबाईल पहात जेवण करण्यामुळे बऱ्याचदा जास्त जेवण होऊन स्थूलपणा येतो. जेवणाकडे दुर्लक्ष झाल्यास चव व जेवणाचे समाधान लाभत नाही. चयापचय मंदावणे, अपचन होणे या गोष्टी विकार वाढवतात. जंक फुडकडेही कल वाढतो.
- डॉ. आशुतोष चोपडे, पोटविकार तज्ज्ञ, सांगली
कोट
टीव्ही पहात जेवण करण्याचे व्यसन मुलांना लागू शकते. त्यामुळे स्थूलपणा, पोटाच्या विकारांना निमंत्रण मिळते. जंक फुड खाण्याकडेही मुलांचा यामुळे कल वाढतो. त्यामुळे भविष्यात ॲनेमिया, हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी राहणे, अशा समस्यांचा सामनाही करावा लागतो.
- डॉ. सुधीर मगदूम, बालरोग तज्ज्ञ, सांगली
कोट
लहान मुलांचे टीव्हीसमोर बसून प्रमाणापेक्षा जास्त खाणे स्थूलपणाला निमंत्रण देते. त्याचे यकृतावर परिणाम होतात. दीर्घकालीन परिणामांनाही अशा मुलांना सामोरे जावे लागते. लघवीसह अन्य नैसर्गिक क्रियाही ते वेळेत करत नसल्याने बद्धकोष्टतेची समस्या होते. लहान मुलांमधील हे प्रमाण वाढले आहे.
- डाॅ. उदयसिंह पाटील, यकृतविकार तज्ज, सांगली
कोट
टीव्ही पहात जेवणाच्या सवयीमुळे मुलगा खूप जेवण करत होता. त्याला पाेटाचा त्रास झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याची ही सवय आम्ही मोडली. आता त्याचे जेवणाचे प्रमाण नियंत्रित झाले आहे.
- पूनम जाधव, गृहिणी
कोट
मुलाला मोबाईल व टीव्ही पहात जेवण्याची सवय आहे. ती सवय बंद करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. अन्य पालकांनीही या गोष्टीची काळजी घ्यावी. बऱ्याचदा डॉक्टर सांगूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे मुलांवर त्याचे दुष्परिणाम होतात.
- सारिका शिंदे, गृहिणी