सर्वांशी नि:स्वार्थीपणे वागा
By admin | Published: January 23, 2016 12:29 AM2016-01-23T00:29:29+5:302016-01-23T00:49:15+5:30
धनश्री तळवलकर : ‘स्वाध्याय’ परिवाराची अंबाबाई तीर्थयात्रा; विराट जनसमुदाय
कोल्हापूर : मी, माझ्यासाठी हे सोडून नि:स्वार्थी भावनेने इतरांसाठीही मी आहे, याची जाणीव करून घ्यावी. परमपूज्य दादांची तीच खरी शिकवण असल्याचे प्रतिपादन स्वाध्याय परिवाराच्या दीदी व स्वर्गीय पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या कन्या धनश्री तळवलकर यांनी शुक्रवारी येथे केले. स्वाध्याय परिवारातर्फे कोल्हापुरातील गांधी मैदान येथे शुक्रवारी सायंकाळी आयोजित तीनदिवसीय अंबाबाई तीर्थयात्रेच्या सांगता समारोपप्रसंगी परिवाराला मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी विराट जनसमुदाय उपस्थित होता.
येथे गेली तीन दिवसांपासून श्री अंबाबाई तीर्थयात्रा सुरु होती. त्यातंर्गत सायंकाळी पूर्णाहुती सोहळा झाला. त्यावेळी स्वाध्यायींना मार्गदर्शन करताना बोलत होत्या. या सोहळ््यास कोल्हापूरसह, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर, बेळगाव, गोव्यासह राज्यभरांतून आलेल्या सुमारे पन्नास हजारांहून स्वाध्यायीन्ांी या कार्यक्रमास उपस्थिती लावली. त्यावेळी धनश्री तळवलकर यांनी सव्वातास आशीर्वचन दिले.
मृत्यूसमयी डोळे झाकून घेण्यासाठी आपली तीर्थयात्रा नसते असे सांगून तळवलकर म्हणाल्या,‘स्वाध्याय परिवराची तीर्थयात्रा ही विकासाची असते. आपण ती यावेळेला कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दरबारात घेतली आहे. तिच्या दरबारात कोणीही येवू शकते, हेच या देवीचे खरे ऐश्वर्य आहे. म्हणूनच तिचे खरे नांवही विश्वप्रिये आहे. संबंध विश्र्वाला स्विकारा. कुणालाही दूर करु नका हे सांगणारीच ही शक्ती आहे. जाती-धर्माच्या,ज्ञानी-अज्ञानी, गरिब-श्रीमंत असा भेदाभेद ही शक्ती कधीच करत नाही. ही सर्वच तिला चालतात म्हणूनच ती विश्र्वप्रिये आहे.’
तळवलकर म्हणाल्या, देव एकच असतो. त्या देवांची नावे वेगवेगळी असू शकतात. माझा योगेश्वर, गणेश, तर अन्य कोणाचा विष्णू, आदी नावे आहेत.सौभाग्य आणि दुर्भाग्याच्याही देवता आहेत. त्यांत सौभाग्याची देवता म्हणजे लक्ष्मी होय. अशी अनेक रूपे घेऊन आई भक्तांनी साद दिली की त्यांच्याकडे धावते.त्यातूनच प्रेमभावनेचे उदात्तीकरण होते. आदिशक्ती म्हणून लक्ष्मीची विविध रूपे, नावे आणि प्रत्येकाने केलेली स्तुती वेगळी असू शकते. प्रत्येकाच्या अडचणीच्या काळात मदतीचा आधार म्हणजे देवाचा दरवाजा असतो. त्यातूनच हाडामांसाची, रक्ताची माणसे जोडली जातात.
या कार्यक्रमात तळवलकर यांनी देवाचा विचार, माणसांशी संबंध आणि देवाचे माणसाच्या जीवनातील महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. या समारोपप्रसंगी महापौर अश्विनी रामाणे यांनी तळवलकर यांचे स्वागत केले. यावेळी खासदार धनंजय महाडिक, बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, आमदार
उल्हास पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांच्यासह स्वाध्याय परिवारातील मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
फेटा मान म्हणून स्वीकारला
फेटा हा लढाई करणाऱ्या कणखर, लढवय्याचे प्रतीक आहे. मला व स्वाध्याय परिवाराला लढायची गरज नाही. एका हातात गीता आणि प्रवचन यातूनच पिढी घडविण्यात मदत होते. त्याच्यासाठी फेटा आवश्यक नाही. फेट्यामध्ये कडक, कणखरपणा असतो. तोही असलाच पाहिजे. कारण समाजाचे रक्षण करणाऱ्याला तो त्याच्या डोक्यावर शोभूनही दिसतो. मान म्हणून हा फेटा मी स्वीकारला आहे.
अनुयायींची मने ज्ािंकली
रुमानियातील फोकलरी मुव्हमेंटच्या प्रमुख मारिया गोस ऊर्फ ऐमाँस यांनी इटालियन भाषेतून केलेल्या भाषणात स्वर्गीय दादा पांडुरंगशास्त्री आठवले यांच्याबद्दलचे ऋणानुबंध सांगितले. त्यात कोल्हापूरवासीय व येथील अनुयायींना भेटून आनंद झाल्याचे सांगितले. शांतीयुक्त विश्व घडवायच्या प्रक्रियेत स्वाध्यायी व आमचे विचार जुळणारे आहेत.
शिस्तबद्ध अनुयायी
पन्नास हजारांहून अधिक स्वाध्यायी परिवारातील अनुयायींनी गांधी मैदान येथे सकाळी अकरापासूनच गर्दी केली होती. त्यात अनुयायींनी आपली चारचाकी वाहने शेंडा पार्क, रेसकोर्स येथील वाहनतळावर लावून रस्त्याच्या एका कडेने ओळीने येतानाचे चित्र शहरातील संभाजीनगर, पाण्याचा खजिना, शाहू बँक, कोळेकर तिकटी, न्यू महाद्वार रोड आणि खरी कॉर्नर या परिसरात जाणाऱ्या येणाऱ्यांना दिसत होते. शिस्तबद्धतेने हे अनुयायी मैदानातही येऊन बसले.