टु बी ऑर नॉट टु बी? बारावी परीक्षेची संभ्रमावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:26 AM2021-05-26T04:26:36+5:302021-05-26T04:26:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : विद्यार्थ्यांच्या भवितव्याला दिशा देणाऱ्या बारावी परीक्षेविषयी सर्वच स्तरावर गोंधळात गोंधळ सुरु आहे. दहावीच्या परीक्षा ...

To be or not to be? The confusion of the twelfth exam | टु बी ऑर नॉट टु बी? बारावी परीक्षेची संभ्रमावस्था

टु बी ऑर नॉट टु बी? बारावी परीक्षेची संभ्रमावस्था

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : विद्यार्थ्यांच्या भवितव्याला दिशा देणाऱ्या बारावी परीक्षेविषयी सर्वच स्तरावर गोंधळात गोंधळ सुरु आहे. दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय ज्या तडफेने घेतला गेला, त्याच तडफेने बारावीचा निर्णय शक्य झालेला नाही. परीक्षा रद्द करण्याविषयी शिक्षणतज्ज्ञांमध्ये मतमतांतरे आहेत.

दहावीनंतर पुढील शिक्षणक्रमांच्या वाटा मर्यादित आहेत, त्यामुळे त्या परीक्षा रद्द केल्याने फारसा गदारोळ झाला नाही. बारावीच्या परीक्षेने मात्र खुद्द शिक्षणतज्ज्ञ आणि शासनाचीच जणू परीक्षा घ्यायला सुरुवात केली आहे.

राज्य शासनाचे दहावी-बारावीविषयीचे बहुतांशी निर्णय सीबीएसईच्या धर्तीवर होतात. सीबीएसई बोर्डाने दहावीची परीक्षा रद्द केल्याने राज्य शासनाने तसाच निर्णय घेतला. आता सीबीएसईने बारावी परीक्षा घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे, त्यामुळे राज्यातही परीक्षेचा निर्णय होण्याची शक्यता आहे. तसा निर्णय जाहीर करण्यात मात्र अद्याप एकमत झालेले दिसत नाही. पण परीक्षा झाल्या पाहिजेत असा सूर शिक्षणतज्ज्ञ, पालक आणि विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.

बारावीनंतर अभियांत्रिकी, वैद्यकीय, कायदा आदी व्यावसायिक शिक्षणक्रमांसाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा (सीईटी) होतात, त्यामुळे बारावीच्या परीक्षेला व गुणांना फारसे महत्व उरत नाही. पण विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी परीक्षा गरजेची असल्याचे शिक्षकांचे मत आहे. त्याशिवाय बीए, बीकॉम, बीएस्सी अशा पारंपरिक शिक्षणक्रमांसाठी बारावीची गुणवत्ता यादी गृहित धरली जाते, त्यामुळेही परीक्षा आवश्यक असल्याचा सूर आहे. सर्रास महाविद्यालयांनी परीक्षा होणार असल्याचे अलिखित संदेश विद्यार्थ्यांना दिले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचीही तयारी सुरु आहे. कोरोनामुळे थेट वर्गात परीक्षा शक्य नाही, पण स्पर्धा परीक्षांच्या धर्तीवर एखाद्या स्वतंत्र केंद्रावर काटेकोर निगराणीखाली ऑनलाईन परीक्षा घेणे शक्य असल्याकडेही शिक्षण तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.

ऑनलाईन, ऑफलाईन आणि वस्तुनिष्ठतेचा पर्याय

बारावीची परीक्षा व्हायलाच हवी. त्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन असे दोन्ही पर्याय देता येतील. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शक्य आहे, त्यांनी घरातून परीक्षा द्यावी. उर्वरित विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयातून द्यावी. बारावी नंतरचे विविध व्यावसायिक शिक्षणक्रमांचे प्रवेश सीईटीद्वारे होतात, त्यामुळे शासनाने सीईटी परीक्षादेखील तातडीने जाहीर करायला हव्यात. बारावी परीक्षेमुळे बीए, बीकॉम व बीएस्सीची प्रवेश प्रक्रियादेखील सुकर होईल.

- प्राचार्य भास्कर ताम्हणकर, सांगली

कोरोना किंवा लॉकडाऊनमुळे बारावीची परीक्षा रद्द करणे कधीही योग्य ठरणार नाही. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन झालेच पाहिजे. असे कठीण प्रसंग भविष्यातही येऊ शकतात, त्याचीही तयारी व्हायला हवी. विद्यार्थ्यांचे वर्षभरात नियमित छोट्या परीक्षांद्वारे मूल्यमापन करता येईल. त्याद्वारे वर्षाअखेरीस विद्यार्थ्यांची गुणवत्ता ठरवता येईल. बारावीची परीक्षा रद्द करण्याने गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होईल हेदेखील लक्षात घेतले पाहिजे. कोरोनाची तीव्रता कमी झाल्यानंतरही त्या घेता येतील.

- प्राचार्य मिलिंद हुजरे, तासगाव

बारावीच्या परीक्षा झाल्या तरच विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होईल. गेले वर्षभर विद्यार्थी ऑनलाईन अभ्यास करत आहेत. परीक्षा जाहीर झाल्या तर

अभ्यासासाठी पुनश्च उजळणी देखील होईल. पुढील व्यावसायिक शिक्षणक्रमांसाठी बारावी हा पाया आहे, त्यामुळे परीक्षा व्हायला हव्यात.

- प्रा. पी. एम. सुतार, मणेराजुरी

विद्यार्थ्यांचे लक्ष शासन निर्णयाकडे

दहावीची परीक्षा रद्द झाली तरी बारावीच्या मात्र होणार असल्याचे शिक्षकांनी सांगितले आहे. त्यामुळे अभ्यास बंद केलेला नाही. परीक्षा झाल्या तर पुढील प्रवेशासाठी चांगले गुण मिळवता येतील, अन्यथा प्रवेश कसे होणार याची चिंता आहे. गेले वर्षभर ऑनलाईन अभ्यास केला आहे, आता परीक्षेची घरात बसून तयारी करत आहे.

- शिवराज कोळी, विद्यार्थी, मिरज

बारावीनंतर इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचा आहे. शासनाने परीक्षा रद्द केली तरी किमान सीईटी घेतलीच पाहिजे. दहावीप्रमाणे वर्गोन्नत केल्यास हव्या त्या शाखेत प्रवेशासाठी आम्हाला धडपड करावी लागेल. त्यामुळे बारावीची परीक्षा किंवा सीईटी या पर्यायांचा विचार शासनाने केला पाहिजे.

- विकास आवटी, विद्यार्थी, तासगाव

वर्षभर ऑनलाईन वर्ग झाले, पण अभ्यास पुरेसा झालेला नाही. परीक्षेविषयी निश्चित निर्णय होत नसल्याने आम्हीही गोंधळात आहोत. बारावीनंतर बीएस्सीला प्रवेश घेणार आहे, त्यामुळे अभ्यास थांबवलेला नाही. परीक्षा झाली पाहिजे, पण त्यासाठी पुरेसा वेळ देऊनच वेळापत्रक जाहीर करावे.

- कोमल व्यवहारे, विद्यार्थिनी, मिरज

पॉईंटर्स

जिल्ह्यातील बारावीचे एकूण विद्यार्थी

३३,०९०

मुली १४,५०५

मुले - १८, ५८५

Web Title: To be or not to be? The confusion of the twelfth exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.