केवळ अधिकारी नाही, तर समाजाचे सेवक बना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:28 AM2021-01-25T04:28:08+5:302021-01-25T04:28:08+5:30
ऐतवडे बुद्रुक : स्पर्धा परीक्षेतून यश संपादन केलेल्या नवोदित युवक-युवतींनी काम करताना आपले पाय जमिनीवर राहावे आणि समाजाच्या हिताचे ...
ऐतवडे बुद्रुक : स्पर्धा परीक्षेतून यश संपादन केलेल्या नवोदित युवक-युवतींनी काम करताना आपले पाय जमिनीवर राहावे आणि समाजाच्या हिताचे रक्षण करता यावे यासाठी केवळ प्रशासकीय अधिकारी न बनता समाजाचे सेवक बना, असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी केले.
ऐतवडे बुद्रुक (ता.वाळवा) येथील शांतिनाथ दिगंबर जैन मंदिरात सन्मती संस्कार मंचच्या वतीने राज्यसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षेतून यश मिळवलेल्या गुणवंतांच्या सत्काराप्रसंगी ते बोलत होते. कुरळप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अरविंद काटे, मिरज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मायादेवी काळगावे, अरविंद बुद्रुक सन्मती संस्कार मंचचे संस्थापक सुरेश चौगुले, सरपंच प्रतिभा बुद्रुक प्रमुख उपस्थित होते.
पिंगळे म्हणाले, पोस्टिंग मिळाली म्हणून भारावून न जाता आपल्याला घडवणारे आई-वडील, शिक्षक यांना कधीही न विसरता आपण गोरगरिबांसाठी कार्य करायचे आहे. सन्मती संस्कार मंचचे कार्य मोठे आहे. मंच करीत असलेले कार्य हे क्रांती नसून उत्क्रांती घडवते आहे. मंचने केलेल्या कार्यामुळे समाज घडविण्यात निश्चित मदत होईल.
अरविंद काटे, मायादेवी काळगावे, प्रा.सुनील परमाज, सुरेश चौगुले, प्रतिभा पवार, विजय शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी मंचचे अध्यक्ष विजय कोकरे, उपाध्यक्ष सुरेश आवटी, मंचचे संघटक, संघटिका, पोलीस उपनिरीक्षक विजय आवटी, विजय शिंदे, जितेंद्र पाटील, सचिन पाटील आदी उपस्थित होते. वर्धमान बुद्रुक यांनी स्वागत केले. क्षमा चौगुले यांनी प्रास्ताविक केले. सौरभ आवटी यांनी आभार मानले.
फोटो - २४०१२०२१-आयएसएलएम- ऐतवडे बुद्रुक न्यूज
ऐतवडे बुद्रुक (ता. वाळवा) येथे सन्मती संस्कार मंचच्या सन्मान सोहळ्यात कृष्णात पिंगळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अरविंद काटे, मायादेवी काळगावे, प्रतिभा बुद्रुक, अशोक शिंदे उपस्थित होते.