Sangli: मुलीचा बाप व्हा, वर्षभर मोफत दाढी-कटिंगचा लाभ घ्या; नातीच्या जन्माच्या आनंदात सुभाष कोरेंचा विधायक उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 06:16 PM2024-01-03T18:16:40+5:302024-01-03T18:38:07+5:30
दुकानासमोर ‘मुलगी झाली हो’ उपक्रमाची माहिती देणारा डिजिटल फलक लावला
संजयकुमार गुरव
डफळापूर : डफळापूर (ता. जत) येथील शुभरत्न जेन्ट्स पार्लर या सलूनचे मालक सुभाष कल्लाप्पा कोरे यांच्या मुलाला मुलगी झाली आणि त्यांच्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेना. नातीच्या जन्माच्या आनंदात काेरे यांनी डफळापुरात संपूर्ण वर्षभरात जन्माला येणाऱ्या मुलींच्या वडिलांची दाढी-कटिंग मोफत करण्याचा संकल्प केला. गेल्या अकरा महिन्यांपासून ते डफळापूर पंचक्रोशीत जन्माला आलेल्या मुलींच्या वडिलांची दाढी व केस कटिंग मोफत करत आहेत.
या उपक्रमाचा डफळापूर पंचक्रोशीतील शंभरावर मुलींचे वडील लाभ घेत आहेत. पंधरा हजार लोकसंख्या असलेल्या डफळापुरातील मुख्य पेठेत गेल्या अठरा वर्षांपासून सुभाष कोरे यांचे शुभरत्न जेन्ट्स पार्लर हे सलून दुकान आहे. त्यांना दोन मुले आहेत. माेठा मुलगा अमोल यांना दोन मुले आहेत. दुसरा मुलगा अनिल यांना २६ जानेवारी २०२३ ला मुलगी झाली. प्रजासत्ताक दिनी मुलीच्या रूपाने घरी लक्ष्मी आली. आपल्या कुटुंबात मुलगी झाल्याने कुटुंबात आनंद झाला.
यानिमित्ताने कोरे कुटुंबाने डफळापूर पंचक्रोशीमध्ये ज्या घरी मुलगी जन्माला येईल त्या मुलीच्या वडिलांची वर्षभर दाढी-कटिंग मोफत करण्याचा संकल्प केला. उपक्रमाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या दुकानासमोर ‘मुलगी झाली हो’ उपक्रमाची माहिती देणारा डिजिटल फलक लावला. त्यानंतर गेल्या अकरा महिन्यांपासून मुलींच्या वडिलांची दाढी व कटिंग मोफत करण्यात येत आहे. आतापर्यंत शंभरहून अधिक मुलींच्या वडिलांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.
कोरे कुटुंबात पिढीजात वारकरी परंपरा आहे. सुभाष कल्लाप्पा कोरे हे माळकरी असून वर्षानुवर्षे पंढरीची वारी करीत आहेत. त्यांची दोन्ही मुलेही सामाजिक कार्यात सहभागी असतात. आपल्या सलूनमध्ये ते गेली दहा वर्षे मुलींचे जावळ मोफत काढत आहेत. यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन मुंबईच्या राष्ट्रीय जनसेवा पक्षाने सुभाष कोरे यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर केला आहे.
मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व ओळखले पाहिजे. सध्या मुलींची संख्या कमी आहे. मुलीच्या जन्माने कुटुंबात आनंद निर्माण व्हावा यासाठी आम्ही हा उपक्रम राबवीत आहाेत. मुली जन्माला याव्यात, याचे प्रबोधन व्हावे यासाठी सामाजिक बांधिलकीतून सर्व समाजबांधवांच्या हातून असे कार्य घडावे. - सुभाष कोरे