आराेपीस मावा देण्यास विराेध केल्याने पाेलिसाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:25 AM2021-03-20T04:25:15+5:302021-03-20T04:25:15+5:30
सांगली : खुनाच्या गुन्ह्याच्या तारखेसाठी जिल्हा न्यायालयात आलेल्या आरोपींना नातेवाईकांनी आणलेला मावा दिला नाही म्हणून पाच आरोपींनी पोलिसाला बेदम ...
सांगली : खुनाच्या गुन्ह्याच्या तारखेसाठी जिल्हा न्यायालयात आलेल्या आरोपींना नातेवाईकांनी आणलेला मावा दिला नाही म्हणून पाच आरोपींनी पोलिसाला बेदम मारहाण केली. न्यायालयाच्या आवारातच गुरूवारी ही घटना घडली.
याप्रकरणी पोलीस नाईक अर्जुन बापू घोदे (वय ३४, रा. व्हसपेठ) यांनी विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली आहे. उमर शहीद शेख, फारूक अजीज मुल्ला (वय ४०), इरफान मुल्ला (वय ३३, तिघे रा. खणभाग, सांगली), इलाईस मुसा मुल्ला (वय ३०, रा. शामरावनगर) , सोहेल खान (वय २०, रा. १०० फुटी रोड,सांगली ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०१७ मध्ये शहरात झालेल्या एका खून प्रकरणातील हे संशयित आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील संजयनगर परिसरात २०१७ मध्ये संशयितांनी खून केला होता. या प्रकारणाची सध्या जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू आहे. गुरुवारी दुपारच्या पावणेचारच्या सुमारास पाचही संशयितांना सुनावणीसाठी न्यायालयात आणण्यात आले होते. यावेळी त्यांचे नातेवाईक आणि मित्र त्यांना भेटण्यासाठी आले होते. तिथे गर्दीही झाली होती. याचदरम्यान, काहींनी आरोपींना खायला मावा दिला. त्यावेळी बंदोबस्तावर असलेल्या घोदे यांनी त्यांना हटकत मावा देण्यास मज्जाव केला.
याचा राग मनात धरून आरोपींनी घोदे यांना तू आमच्या नातेवाईकांना का भेटू देत नाहीस, असे म्हणत शिवीगाळ करत बेदम मारहाण करण्यास सुरवात केली. याचवेळी संशयित उमर शेख याने घोदे यांच्या पोटात लाथ घातली. त्यानंतर इतर पोलीस धावत आले व त्यांनी त्यांना रोखले. यावेळी या पाच जणांनी जामिनावर सुटल्यावर तुला बघून घेतो, अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
चौकट
वरिष्ठांकड्न गंभीर दखल
पोलिसाला न्यायालयाच्या आवारातच आरोपींकडून झालेल्या मारहाणीची गंभीर दखल घेण्यात आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार घोदे यांनी विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. दरम्यान, पोलिसांवर हात उचलणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.