शहरातील ५० चौकांचे सुशोभीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:49 AM2021-03-04T04:49:08+5:302021-03-04T04:49:08+5:30
कापडणीस म्हणाले की, शहरातील विविध चौकांच्या सुशोभीकरणासाठी सामाजिक संघटना, खासगी संस्था, शैक्षणिक संस्था, रुग्णालयांनी पुढाकार घेतला आहे. अजूनही अनेक ...
कापडणीस म्हणाले की, शहरातील विविध चौकांच्या सुशोभीकरणासाठी सामाजिक संघटना, खासगी संस्था, शैक्षणिक संस्था, रुग्णालयांनी पुढाकार घेतला आहे. अजूनही अनेक संस्था या कामात सहभागी होण्यास इच्छुक आहेत. शहरातील पुष्पराज चौक ते टाटा पेट्रोल पंपापर्यंतच्या रस्त्याच्या मधोमध असलेला भागाचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी एका उद्योजकांशी सकारात्मक चर्चा झाली आहे. पुष्पराज चौकापासून ते टाटा पेट्रोल पंपापर्यंत सायकल ट्रॅक, पादचारी मार्गही करण्यात येणार आहे. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात आहेत. या विभागाने या रस्त्याच्या सुशोभीकरणासाठी ‘ना हरकत पत्र’ दिले आहे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडील अनेक रस्त्यांवर चौक सुशोभीकरणासही मान्यता मिळाली आहे. या चौकांचीही कामे लवकरच हाती घेतली जाणार आहेत. त्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडेल.
कुपवाड शहरासाठी स्वतंत्र उद्यानाचे नियोजन केले आहे पण तिथे मोठा भूखंड मिळालेला नाही तरीही ६० लाख रुपये खर्चून कुपवाडला उद्यान केले जाणार आहे. आमराई उद्यानातही एक कोटी रुपयांच्या विकासकामे हाती घेतली आहे. त्यात धबधबा, सेल्फी पाॅईंटचा समावेश आहे. गार्डन ट्रेन मात्र नेमीनाथनगर येथील बालोद्यानात स्थलांतरित केली आहे. काळ्या खणीतही एका बांधकाम व्यवसायिकांनी दोन कारंजा उभारण्याचा प्रस्ताव दिला आहे, असे ते म्हणाले.
चौकट
वाहन खरेदीला मान्यता
घनकचऱ्यासाठी १८ कोटी रुपयांच्या वाहन खरेदीला स्थायी समितीने मंजुरी दिली होती. आता शासनानेही या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केेले आहे. रोडस्वीपरसह अनेक मोठी वाहने महापालिकेकडून खरेदी केली जाणार आहेत. त्यामुळे कचरा उठावाची यंत्रणा अधिक सक्षम होईल, असेही कापडणीस यांनी सांगितले.
चौकट
‘बजेट’मध्ये करवाढ नाही
महापालिकेचे अंदाजपत्रक बुधवारी स्थायी समितीकडे सादर केले जाणार आहे. गतवर्षीइतकेच यंदाचेही अंदाजपत्रक आहे. त्यात कोणतीही करवाढ केलेली नाही. कोरोनाचे संकट वाढले नाही तर शहराच्या विकासाला आणखी गती देईल, असेही कापडणीस यांनी स्पष्ट केले.