‘साजशृंगारा’तून सखींना सौंदर्यसंवर्धनाच्या टिप्स
By admin | Published: June 28, 2015 10:43 PM2015-06-28T22:43:35+5:302015-06-29T00:27:04+5:30
आपल्या व्यक्तिमत्त्वाचे सौंदर्य खुलविताना नखांचे आकर्षक दिसणे महत्त्वाचे असते,
इस्लामपूर : विविध प्रकारच्या पध्दतीने साडी परिधान करण्यासह आकर्षक केशरचना आणि नेल आर्ट अशा विविध प्रकारच्या साजशृंगाराची मेजवानी मिळवत ‘लोकमत’ सखी सदस्यांनी व्यक्तिमत्त्व प्रसन्न आणि सौंदर्यवर्धक करण्याचे धडे घेतले.
‘लोकमत’ सखी मंचने इस्लामपूर शहर व परिसरातील सखी सदस्यांसाठी महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या ‘साजशृंगार’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जय हनुमान नागरी सहकारी पतसंस्थेच्या कुसूमताई पाटील सभागृहात हा कार्यक्रम झाला. प्रशिक्षिका अनुराधा सूर्यवंशी यांनी साडी परिधान करण्याचे प्रकार दाखवून कार्यक्रमाची सुरुवात केली. या कार्यक्रमास सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आपल्या देहबोलीला आकर्षक बनविणाऱ्या या साडी ड्रेपिंगने सखी मंत्रमुग्ध झाल्या. गुजराती, बंगाली, बॉलीवूड, म्हाळसा, नऊवारी, मुमताज यांसह अनेक प्रकारे साडी परिधान करण्याचे धडे सूर्यवंशी यांनी सखींना दिले.
वॉटर फॉल, फ्रेंच रोल, नेट अंबाडा अशा केशरचना दाखविल्या. आपल्या व्यक्तिमत्त्वाचे सौंदर्य खुलविताना नखांचे आकर्षक दिसणे महत्त्वाचे असते, असे सांगत सूर्यवंशी यांनी विविध प्रकाराने नखे सजविण्याचे प्रात्यक्षिक दाखविले.सुमारे चार तास हा कार्यक्रम रंगला. यामध्ये सखींसाठी स्पॉट गेम आणि साजशृंगार प्रशिक्षणावर आधारित प्रश्नमंजुषा घेण्यात आली. विजेत्या सखींना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. यावेळी जून महिन्यात वाढदिवस असणाऱ्या सखींसाठी केक कापून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. सखी मंच संयोजिकांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. (वार्ताहर)
स्पॉट गेम स्पर्धा
साजशृंगार कार्यक्रमावेळी घेण्यात आलेल्या स्पॉट गेममध्ये स्रेहा खटावकर, सुप्रिया साठे, वैशाली कुटे, सुशिला चव्हाण, ज्योत्स्ना कुलकर्णी या विजेत्या ठरल्या. त्यांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.