Sangli: शक्तीपीठ महामार्गामुळे मिरज, तासगावातील बागायतींवर फिरणार नांगर, जमिनींच्या व्यवहारांवर निर्बंध

By संतोष भिसे | Published: March 5, 2024 01:56 PM2024-03-05T13:56:35+5:302024-03-05T13:56:56+5:30

मणेराजुरीचा द्राक्षपट्टा संकटात; एकरी दोन कोटी रुपयांच्या भरपाईसाठी शेतकऱ्यांची वज्रमूठ

Because of Shaktipeeth Highway Horticulture in Miraj, Tasgaon in Sangli district will be damaged | Sangli: शक्तीपीठ महामार्गामुळे मिरज, तासगावातील बागायतींवर फिरणार नांगर, जमिनींच्या व्यवहारांवर निर्बंध

Sangli: शक्तीपीठ महामार्गामुळे मिरज, तासगावातील बागायतींवर फिरणार नांगर, जमिनींच्या व्यवहारांवर निर्बंध

संतोष भिसे

सांगली : प्रस्तावित नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गामुळे शेकडो एकर बागायती शेतीवर नांगर फिरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा महामार्ग कोणत्या गावांतून जाणार याचे राजपत्र शासनाने आठवडाभरापूर्वी प्रसिद्ध केले. कोणत्या गावातील किती जमीन घेतली जाणार याचा तपशील राजपत्रात स्पष्ट केला आहे.

राज्यातील १२ जिल्ह्यांतून ८०२ किलोमीटर लांबीचा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. तो सांगली जिल्ह्यातील तासगाव, कवठेमहांकाळ, मिरज तालुक्यांतून जाणार आहे. कवठेमहांकाळमधील जमिनी दुष्काळी आहेत. तासगाव आणि मिरज तालुक्यांतील जमिनी मात्र सुपीक आणि नदीकाठच्या आहेत. सध्या तेथे हजारो टन ऊस, द्राक्षे, हळद आदी बागायती पिके घेतली जातात. जिल्ह्याच्या अर्थकारणात त्यांचा वाटा मोठा आहे. आता महामार्गाच्या निमित्ताने त्यावर नांगर फिरणार आहे. ऊस व द्राक्षपट्टा उद्ध्वस्त होणार आहे.

भूसंपादन कायद्यानुसार सरकारी प्रकल्पांसाठी सक्तीने जमीन घेण्याची तरतूद आहे. शेतकरी फक्त भरपाईच्या रकमेत आक्षेप घेऊ शकतात, पण प्रकल्प अडवू शकत नाहीत. त्यामुळे कितीही कायदेशीर लढा दिला, तरी जमिनी देण्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नसेल. रत्नागिरी-नागपूर महामार्गासाठी भरभक्कम भरपाई मिळाली. त्यानंतर सरकारने भरपाईच्या नियमात बदल केले, त्यामुळे शक्तीपीठसाठी तितक्या भरपाईची शक्यता नाही. महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीने एकरी दोन कोटी रुपयांसाठी वज्रमूठ केली आहे. महापालिका क्षेत्रात एकरी चार कोटींची मागणी आहे.

दरम्यान, महामार्गाची आणि भूसंपादनाची अधिसूचना राजपत्रात जाहीर झाल्याने महामार्ग क्षेत्रातील जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारांवर निर्बंध लागू झाले आहेत.

सांगली जिल्ह्यातील या गावांत भूसंपादन

कवठेमहांकाळ तालुका : घाटनांद्रे, तिसंगी, डोंगरसोनी. तासगाव तालुका : सिद्धेवाडी, सावळज, अंजनी, वज्रचौंडे, गव्हाण, मणेराजुरी, सावर्डे, मतकुणकी, नागाव कवठे. मिरज तालुका : कवलापूर, बुधगाव, माधवनगर, कर्नाळ, पद्माळे, सांगलीवाडी.

सर्वाधिक संपादन मणेराजुरी, कवलापुरात

मणेराजुरीमधील १५२ गट संपादित केले जाणार आहेत. गव्हाण ११, सावर्डे १, मतकुणकी ३९, नागावकवठे १००, वज्रचौंडे ४७, अंजनी ५६, सावळज, सिद्धेवाडी ३ गट संपादित केले जातील. सांगलीवाडीत ५३, पद्माळेत ४४, कर्नाळमध्ये ६५, माधवनगरमध्ये १०७, बुधगावमध्ये ९६ व कवलापुरात १४५ गटांमध्ये भूमीसंपादन होईल. डोंगरसोनीमध्ये ६२, घाटनांद्रेमध्ये १०३, तिसंगीमध्ये ५१ गटांतील शेती घेतली जाणार आहे.

आज सांगलीत, उद्या कवलापुरात बैठक

शक्तीपीठ महामार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांची व कार्यकर्त्यांची बैठक सांगलीत मंगळवारी (दि. ५) आयोजित केली आहे. पंचमुखी मारुती रस्त्यावर कष्टकऱ्यांची दौलत कार्यालयात दुपारी तीन वाजता बैठक होईल. स्वाभिमानी संघटनेचे महेश खराडे, किसान सभेचे उमेश देशमुख आणि नागरिक जागृती मंचाचे सतीश साखळकर यांनी आयोजन केले आहे.

दुसरी बैठक कवलापूर (ता. मिरज) येथे बुधवारी (दि. ६) होणार आहे. सिद्धेश्वर मंदिरात दुपारी चार वाजता शेतकरी एकत्र येतील. नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीने आयोजन केले आहे. दोन्ही बैठकांत महामार्गासाठी भूसंपादन व भरपाई या विषयांवर चर्चा होणार आहे. संयोजक दिगंबर कांबळे यांनी ही माहिती दिली.

Web Title: Because of Shaktipeeth Highway Horticulture in Miraj, Tasgaon in Sangli district will be damaged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.