सुपारी घेऊन काढली जातात अतिक्रमणे

By admin | Published: July 4, 2017 11:31 PM2017-07-04T23:31:18+5:302017-07-04T23:31:18+5:30

सुपारी घेऊन काढली जातात अतिक्रमणे

The beetles are taken away with encroachments | सुपारी घेऊन काढली जातात अतिक्रमणे

सुपारी घेऊन काढली जातात अतिक्रमणे

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिका क्षेत्रात पैसे घेऊन अतिक्रमणे काढली जात आहेत, अधिकारी अतिक्रमण काढण्यासाठी सुपारी घेतात, असा गंभीर आरोप मंगळवारी महासभेत नगरसेवकांनी केला. गटनेते किशोर जामदार यांनी मिरजेतील एका कुंपणभिंतीच्या अतिक्रमणावरून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. लतिफ पठाण कॉलनीतील अतिक्रमणासाठी राष्ट्रवादीचे नगरसेवक बाळासाहेब सावंत यांच्यासह राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापौरांच्या आसनासमोरच ठिय्या मारला. अतिक्रमण काढल्याशिवाय कामकाज सुरू करू देणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. अखेर महापौरांनी अतिक्रमण हटाव पथकाला तातडीने अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले.
महापौर हारूण शिकलगार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी महासभा झाली. सभेत राष्ट्रवादीचे नगरसेवक बाळासाहेब सावंत यांनी, लतिफ पठाण कॉलनीत ३० फुटी रस्त्यावरील अतिक्रमण अद्याप काढले नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. या अतिक्रमणाबाबत गेले सात ते आठ महिने पाठपुरावा करीत आहे. आयुक्तांकडे कित्येकवेळा बैठका झाल्या. पण अतिक्रमण निघाले नसल्याचे सांगत त्यांनी महापौरांच्या आसनाकडे धाव घेतली. मागासवर्गीय समितीच्या सभापती स्नेहल सावंत, राजू गवळी, विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते, दिग्विजय सूर्यवंशी, विष्णू माने, मनगू सरगर या सदस्यांनीही त्यांना साथ देत महापौरांच्या आसनासमोरच ठिय्या मारला. अतिक्रमण हटल्याशिवाय सभागृहाचे कामकाज सुरू करू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला.
आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनीही, सावंत यांनी वारंवार पाठपुरावा केल्याचे कबूल करीत अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. पण त्यांच्या बदल्या झाल्याने अतिक्रमण जैसे थेच राहिले आहे. त्यात पोलिस संरक्षण घेऊन अतिक्रमण हटविले जाईल, असे सांगितले. पण त्यावर सदस्यांचे समाधान झाले नाही. अखेर महापौर शिकलगार यांनी मालमत्ता व्यवस्थापक वैभव वाघमारे यांना अतिक्रमण पथकासह तातडीने अतिक्रमण काढण्यासाठी पाठविले.
याचवेळी गटनेते किशोर जामदार यांनी, मिरजेतील कुंपणभिंत बेकायदेशीरपणे हटविल्याचा मुद्दा उपस्थित केला. अधिकारी पैसे घेऊन अतिक्रमण काढतात, असा गंभीर आरोपही केला. यावेळी अतिक्रमण हटाव पथकाचे प्रमुख दिलीप घोरपडे यांना त्यांनी चांगलेच धारेवर धरले. एका बाजूने अतिक्रमण न काढता, विशिष्ट अतिक्रमणेच काढण्यावर घोरपडेंचा भर होता. त्यांनी कुठलेही मार्किंग न करता अतिक्रमण हटविले. याबाबत आयुक्तांनी दूरध्वनी करून त्यांना सूचना केल्या होत्या. पण तरीही त्यांनी ऐकले नाही. त्यांना या पदावर नेमलेच कसे? असा सवाल जामदार यांनी उपस्थित केला.
लोकशाही दिनात तक्रार होताच सायंकाळी अतिक्रमण काढण्याइतपत प्रशासन कधी सुधारले, असा सवाल सुरेश आवटी यांनी केला.
विष्णू माने म्हणाले की, सभागृह नेत्यांच्या दूरध्वनीला अधिकाऱ्यांनी दाद दिली नाही. त्यांच्यामागे कुणाचा तरी वरदहस्त असावा. घोरपडेंकडे हिंमत असेल तर त्यांनी लतिफ पठाण कॉलनीतील अतिक्रमण आजच काढून दाखवावे.
गौतम पवार यांनी, राममंदिर चौकातील एक हातगाडा अधिकाऱ्यांनी हटवून बिल्डरला वाळू, खडी ठेवण्यासाठी फूटपाथ रिकामा करून दिला आहे, असे सांगून, अधिकाऱ्यांनी बिल्डरची सुपारी घेतली आहे का, असा सवाल केला.
प्रशांत पाटील- मजलेकर यांनी, अकार्यक्षम अधिकाऱ्याकडे पदभार दिल्याने हा गोंधळ उडाल्याचे सांगितले. अखेर अधिकाऱ्यांनी त्यांच्या मर्यादेत राहावे, असा दम भरत, ज्येष्ठ नगरसेवकांचा सन्मान करा, असा सल्लाही महापौरांनी दिला.
दिलीप घोरपडेंना पदावरून हटविले
गटनेते किशोर जामदार यांनी अतिक्रमण हटाव पथकाचे प्रमुख दिलीप घोरपडे यांना सभेत धारेवर धरले. मिरजेतील अतिक्रमण हटविताना घोरपडेंनी चुकीच्या पद्धतीने कार्यवाही केली आहे. कुठलेही मार्किंग न करता अतिक्रमण हटविले. त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी, ‘कोण किशोर जामदार?’ असे उद्धट उत्तर दिले. त्यांना तांत्रिक कामाची माहिती आहे. ते कनिष्ठ लिपिक असताना वरिष्ठ पद कसे देण्यात आले? त्यांची पदोन्नती कोणत्या निकषात करण्यात आली? असे म्हणत त्यांनी प्रशासनाला जाब विचारला. अखेर महापौर शिकलगार यांनी घोरपडे यांना पदावरून हटविण्याचे आदेश आयुक्तांना दिले.

Web Title: The beetles are taken away with encroachments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.