सांगलीतील रिलायन्स ज्वेल्सवर दरोडा: कोल्हापूरसह साताऱ्यातही केली होती ‘रेकी’
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 01:51 PM2023-12-12T13:51:19+5:302023-12-12T13:52:34+5:30
इतर सात जण अद्याप पसार
सांगली : सांगलीत जून महिन्यात रिलायन्स ज्वेल्सवर दरोडा टाकण्यापूर्वी मास्टरमाइंड सुबोध सिंग याच्या टोळीने सांगलीसह कोल्हापूर व सातारा येथील रिलायन्स ज्वेल्सची ‘रेकी’ केली होती. कोल्हापूर व सातारामधील शॉपी दरोड्यासाठी योग्य नसल्यामुळे सांगलीला ‘टार्गेट’केले. तशातच रविवार सुटीचा दिवस, मुख्य रस्त्यावर पाइपलाइनच्या कामामुळे रस्ता बंद, दुपारची सामसूम पाहूनच दरोडा टाकल्याचे तपासात स्पष्ट झाले.
दरम्यान, पोलिसांनी सुबोध सिंग, मोटारीचा चालक अंकुर प्रतापसिंग व तिसरा संशयित मोहम्मद शमशाद मोहम्मद मुख्तार या तिघांना अटक केली आहे. इतर सात जण अद्याप पसार आहेत.
पोलिस तपासातून मिळालेली माहिती अशी, बिहारमधील पाटणा येथील बेऊर कारागृहामध्ये असलेल्या ज्वेलथीफ सुबोध सिंग याने कारागृहामधूनच दरोडेखोरांची टोळी बनवली होती. याच टोळीला त्याने मोबाइलवरून सांगलीसह सातारा व कोल्हापूर येथील रिलायन्स ज्वेल्सची माहिती दिली होती. तिन्ही ठिकाणच्या ज्वेल्सची टोळीने ‘रेकी’ केली. कोल्हापूर येथील शॉपी दुसऱ्या मजल्यावर होती. तर, सातारा येथील ज्वेल्सपासून पोलिस ठाणे जवळ होते. कोल्हापूर व सातारा येथे दरोडा टाकणे धोक्याचे असल्यामुळे सांगलीला पसंती दिली. त्यानंतर सांगलीत मिरजेकडे जाणारा रस्ता बंद असल्यामुळे सामसूम परिस्थितीचा फायदा घेत दरोडा टाकला.
स्थानिक गुन्हे अन्वेषण व विश्रामबागच्या पथकाने कसून तपास करत टोळीतील चौघांची नावे निष्पन्न केली. अंकुर प्रतापसिंग याला प्रथम ओडिशा येथून ताब्यात घेतले. त्यानंतर तपासात सुबोध सिंग टोळी असल्याचे स्पष्ट झाले. सुबोध सिंगला देखील नुकतेच अटक केली. त्यानंतर तिसरा दरोडेखोर मोहम्मद मुख्तार याला अटक केली. त्याला दहा दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. अद्याप सात जण पसार आहेत. सांगलीतील दरोड्यात नऊ जणांचा सहभाग होता. तर, सुबोधसिंगने कारागृहातून सूत्रे हलवल्याचे स्पष्ट झाले आहे.
सुबोधसिंग व मुख्तार या दोघांना वेगवेगळ्या पोलिस कोठडीत ठेवले आहे. मुख्तार हा दरोड्यापूर्वी काही दिवस अगोदर बेऊर कारागृहात खुनी हल्ल्याच्या गुन्ह्यात आतमध्ये गेला होता. तेथे सुबोध सिंगच्या संपर्कात आला. त्यानंतर त्याला टोळीत सहभागी करून घेतले. दरोड्यातील संशयित प्रताप राणा याने त्याच्याशी संपर्क साधून दरोड्यात सहभागी करून घेतले. मुख्तार हा रिलायन्समधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आला आहे. त्याने अधिकारी, कर्मचारी यांचे हातपाय बांधून दागिने गोळा केले होते.
सुबोध सिंगला ‘एनडीए’त जायचे होते
सुबोध सिंग हा बारावी उत्तीर्ण आहे. त्याचे आई-वडील शेती करतात. तो सधन कुटुंबातील आहे. त्याला बारावीनंतर ‘एनडीए’मध्ये जायचे होते. परंतु, तिकडे जाता आले नसल्याने तो नंतर गुन्हेगारीकडे वळाला असल्याची माहिती पुढे आली आहे.