सांगलीत पूरग्रस्त भागांमधील पंचनाम्यांना सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:24 AM2021-08-01T04:24:53+5:302021-08-01T04:24:53+5:30
सांगली : शहरातील पूरग्रस्त भागातील नागरी वस्त्या, बाजारपेठांमध्ये पंचनाम्याच्या कामास सुरुवात झाली आहे. येत्या आठवडाभरात पंचनाम्याचे काम पूर्ण होण्याची ...
सांगली : शहरातील पूरग्रस्त भागातील नागरी वस्त्या, बाजारपेठांमध्ये पंचनाम्याच्या कामास सुरुवात झाली आहे. येत्या आठवडाभरात पंचनाम्याचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. विविध व्यापारी संघटना व सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, नगरसेवकही याकामी अधिकारी, कर्मचाऱ्यांना मदत करीत आहेत.
शहरातील ज्या पूरग्रस्त भागामध्ये पाणी ओसरले आहे, त्या ठिकाणी पंचनाम्यांना सुरुवात झाली आहे. व्यापारी पेठांमध्येही पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना अल्प दिलासा मिळाला आहे. पुराचे पाणी ज्या भागात अद्याप कायम आहे, त्या ठिकाणी पाणी ओसरल्यानंतर पंचनामे करण्यात येणार आहेत. पूरग्रस्त भागातील नगरसेवक, कार्यकर्ते, सामाजिक संघटना, व्यापारी संघटनांचे पदाधिकारीही याकामी प्रशासनाची मदत करीत आहेत. पूरग्रस्तांना प्राथमिक स्वरूपात १० हजार रोख व पाच हजार धान्याच्या स्वरूपात मदत मिळणार आहे. व्यापाऱ्यांनाही भरपाई देण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले आहे. त्यामुळे पंचनाम्यांचा अहवाल सादर होणे महत्त्वाचे आहे.
व्यापारी संघटनांनी शासनाकडे भरीव आर्थिक मदतीसह करसवलतींची मागणी केली आहे. त्यामुळे याबाबत शासन काय निर्णय घेणार याकडेही व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे. पंचनाम्यातून कोणतेही दुकान सुटणार नाही, याची दक्षता घेण्यात येत आहे.
चौकट
दुकान, गोदामाबद्दल गोंधळ
काही व्यापाऱ्यांचे दुकान व गोदाम दोन्हीही पाण्यात गेले होते. याशिवाय काही व्यापाऱ्यांची दोन दुकाने व गोदाम वेगवेगळी आहेत. अशावेळी त्यांचे वेगवेगळे पंचनामे करता येणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. वास्तविक दोन्ही ठिकाणी नुकसान झाले असल्याने पंचनाम्यात त्यांचा समावेश करावा, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.
चौकट
पालकमंत्र्यांकडून पदाधिकाऱ्यांना सूचना
पालकमंत्री जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनाही प्रशासनाला पंचनामे करण्यासाठी सहकार्य करण्याची सूचना दिली आहे. एकही पूरग्रस्त पंचनाम्यापासून व मदतीपासून वंचित राहणार नाही अशी दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले आहे. त्यानुसार राष्ट्रवादीचे पदाधिकारीही प्रशासनाला मदत करीत आहेत.