पैसे वाटून निवडून येतोय! : सांगली नगरसेवकाचे धक्कादायक विधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 12:02 AM2018-12-20T00:02:37+5:302018-12-20T00:03:33+5:30
सांगली शहरातील संजयनगर येथील अभिनंदन कॉलनीतील गल्ली क्रमांक तीनमध्ये महापालिकेच्या फंडातून सुरू असलेल्या रस्त्याचे काम नागरिकांनी बुधवारी दुपारी बंद पाडले.
संजयनगर : सांगली शहरातील संजयनगर येथील अभिनंदन कॉलनीतील गल्ली क्रमांक तीनमध्ये महापालिकेच्या फंडातून सुरू असलेल्या रस्त्याचे काम नागरिकांनी बुधवारी दुपारी बंद पाडले. यावेळी नागरिकांनी नगरसेवक मनगू सरगर यांना जाब विचारण्याचा प्रयत्न करताच संतापलेल्या सरगर यांनी ‘पैसे वाटून निवडून येतोय, बोलायचं काम नाय’ असे सुनावल्याने उपस्थितांना धक्का बसला.
संजयनगरला अभिनंदन कॉलनीत तिसऱ्या गल्लीत रस्त्याचे काम सुरू आहे. सुमारे सात लाख रुपये खर्च करून बीबीएम रस्ता करण्यात येत होता. नागरिकांनी कारपेट रस्ता करावा, या मागणीसाठी रस्त्याचे काम बंद पाडून ठेकेदाराला जाब विचारला. यावेळी ठेकेदार व नागरिकांत जोरदार वाद झाला. याची माहिती मिळताच नगरसेवक मनगू सरगरही तेथे आले. नागरिकांनी सरगर यांना याबाबत जाब विचारला. ‘
तुम्ही तीनवेळा नगरसेवक झाला, पण पंधरा वर्षात याठिकाणी कारपेट रस्ता का केला नाही? कारपेट रस्ताच करा, बीबीएम रस्ता नको’, अशी मागणी नागरिकांनी केली. त्यानंतर सरगर व नागरिकांमध्ये वादावादी झाली. संतापलेल्या सरगर यांनी, ‘मी पैसे देऊन निवडून आलो आहे. बोलायचं काम नाही’, असे उत्तर दिले. त्यांच्या या अनपेक्षित उत्तरामुळे उपस्थितांना धक्का बसला. यानंतर ठेकेदार व तुम्ही बघून घ्या, असे म्हणत सरगर यांनी तेथून काढता पाय घेतला.
नागरिकांनी मात्र हा रस्ता कारपेट करावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला. याप्रश्नी आयुक्त रवींद्र खेबूडकर, जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांना निवेदन देणार असल्याचे सांगितले. यावेळी शेरबानू बागवान, सुखदेव गडदे, रेश्मा मुल्ला, मोहन सरगर, संजय सरगर, रोहित केंगार, सुरेश जाधव, इम्रान शेख, भानुदास सरगर, दिलावर गवंडी, सलीम बागवान उपस्थित होते.
सांगलीतील संजयनगर येथील अभिनंदन कॉलनीत बुधवारी महापालिकेच्या फंडातून सुरू असलेल्या बीबीएम रस्त्याचे काम नागरिकांनी बंद पाडले.