‘इंजिनिअर’ होऊनही ठरला अंधश्रद्धेचा बळी..! भानामतीचे भूत : संशयामुळे हॉटेल कामगार जिवाला मुकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 11:21 PM2019-03-12T23:21:39+5:302019-03-12T23:23:46+5:30

मनोज श्रीधर गाडे... वय ४२... एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याचा मुलगा... स्वत:ही बी. ई. मेकॅनिकल इंजिनिअर झालेला... तरीही तो अंधश्रद्धेचा बळी ठरला. भानामतीचा संशय पक्का होत गेल्याने, त्याच्या क्रोधाने

Being the engineer, the victim became the victim of superstition! Bhanatha's ghost: Hotel worker Jiwala Mukta due to suspicion | ‘इंजिनिअर’ होऊनही ठरला अंधश्रद्धेचा बळी..! भानामतीचे भूत : संशयामुळे हॉटेल कामगार जिवाला मुकला

‘इंजिनिअर’ होऊनही ठरला अंधश्रद्धेचा बळी..! भानामतीचे भूत : संशयामुळे हॉटेल कामगार जिवाला मुकला

Next
ठळक मुद्देशहरातील दोन कुटुंबांची झाली वाताहत

सांगली : मनोज श्रीधर गाडे... वय ४२... एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याचा मुलगा... स्वत:ही बी. ई. मेकॅनिकल इंजिनिअर झालेला... तरीही तो अंधश्रद्धेचा बळी ठरला. भानामतीचा संशय पक्का होत गेल्याने, त्याच्या क्रोधाने हॉटेल कामगार सुरेश पाष्टे यांना जिवाला मुकावे लागले. मागील आठवड्यात ही खुनाची घटना शहराच्या संजयनगर येथे घडली होती. आजच्या आधुनिक युगात अंधश्रद्धेला फाटा दिला जात असला तरी, मनोजच्या डोक्यातील संशयाच्या भुताने दोन कुटुंबांची वाताहत झाली आहे.

संजयनगरमधील रेळेकर प्लॉटमध्ये मनोज गाडे कुटुंबासह राहतो. त्याचा मोठा भाऊ संगणकशास्त्रातील तज्ज्ञ आहे. तो उस्मानाबाद येथे असतो. मनोजचे वडील शासकीय लेखापरीक्षक होते. दोन्ही मुलांनाही त्यांनी उच्चशिक्षण दिले. मनोजला बी. ई. मेकॅनिकलची पदवी घेण्यासाठी कºहाड येथे शिक्षणासाठी पाठविले. कºहाडला जाण्यापूर्वी त्याच्या शेजारी राहणारे सुरेश पाष्टे यांच्याशी त्याचा वाद झाला होता. घरच्यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटविला होता. तीन वर्षे त्याने शिक्षण घेऊन बी. ई. मेकॅनिकलची पदवी संपादन करुन तो सांगलीत परतला. त्यानंतर त्याचा विवाह झाला. दरम्यान, वडिलांना काही वर्षांपूर्वी अर्धांगवायू झाला. ते अंथरुणाशी खिळून राहिले. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूपासून मनोजचे मानसिक संतुलन बिघडले. तो नेहमी तणावग्रस्त दिसत असे. घरचा गाडा चालविण्याची जबाबदारी त्याच्यावर आली. तो घरी खासगी शिकवणी घेत होता. महिन्याला चार-पाच हजार रुपये मिळत होते. एवढ्यावरच तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. त्याला अपत्य होत नसल्यानेही तो नाराज होता.

पाष्टे यांच्याशी तो बोलत नव्हता. पाष्टे यांना तीन मुले आहेत. ती कामधंदा करतात. स्वत: पाष्टेही अजून काम करतात. त्यामुळे त्यांच्या घरची परिस्थिती चांगली आहे. पण पाष्टे यांच्याशी भांडण झाल्यापासून आपल्या घरातील वातावरण मात्र बिघडले आहे, असे मनोजला नेहमी वाटत होते. पाष्टे मूळचे कोकणातील होते. ते माझ्या कुटुंबावर भानामती तर करील नसतील ना?, असे संशयाचे भूत त्याच्या डोक्यात शिरले होते. ही बाब त्याने घरातही बोलून दाखविली होती. घरच्यांनी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले होते. आजच्या आधुनिक युगात अंधश्रद्धेला फाटा दिला जात असला तरी, मनोजच्या डोक्यातील भानामतीच्या संशयाचे भूत वाढतच गेले. उच्चशिक्षित असूनही त्याला अंधश्रद्धेच्या संशयाने गिळून टाकले. पाष्टे यांच्याकडून कुटुंबावर होणारी भानामती बंद व्हावी, यासाठीच त्याने त्यांचा खून केला. त्याचा कबुलीनामा ऐकून पोलीसही चक्रावून गेले आहेत.

दुचाकीवर रक्ताचेच डाग
गाडे याने गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे. या दुचाकीवर रक्ताचे प्रचंड डाग आढळून आले आहेत. त्याने पाष्टे यांच्या अंगावर बसून २८ वार केले. यामध्ये त्याचा शर्ट रक्ताने माखलेला होता. तसाच तो दुचाकीवर बसून पळून गेल्याने दुचाकीवर रक्ताचे डाग पडले होते. खुनासाठी त्याने दोन चाकू वापरले. एक चाकू घटनास्थळी तुटून पडला. त्यानंतर पाष्टे हे मृत होऊनही त्याने खिशातील दुसऱ्या चाकूने त्यांच्यावर वार केले. हा चाकू त्याने इनामधामणी रस्त्यावर फेकून दिल्याची कबुली दिली आहे.

दोन्ही कुटुंबात आक्रोश
पाष्टे हे पत्नी व तीन मुलांसह राहत होते. त्यांच्या घरापासून केवळ पाच फूट अंतरावर मनोज गाडे याचे घर आहे. पाष्टे यांचा खून झाल्याने त्यांची मुले वडिलांविना पोरकी झाली, तर कुटुंबप्रमुखालाच खुनाच्या गुन्ह्यात अटक झाल्याने गाडे कुटुंबाला जबरदस्त मानसिक धक्का बसला आहे. गाडेच्या डोक्यातील संशयाच्या भुतामुळे मात्र या दोन्ही कुटुंबांची वाताहत झाली आहे.

Web Title: Being the engineer, the victim became the victim of superstition! Bhanatha's ghost: Hotel worker Jiwala Mukta due to suspicion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.