बेळंकीच्या रेल्वे पुलाखालील कॉँक्रिटीकरण अखेर सुरू!
By admin | Published: November 7, 2014 11:02 PM2014-11-07T23:02:45+5:302014-11-07T23:36:35+5:30
रेल्वे प्रशासनाला आली जाग : प्रवासी, वाहनधारकांतून समाधान--लोकमतचा दणका
लिंगनूर : अखेर बेळंकी येथील रेल्वे पुलाखाली कॉँक्रिटीकरण करण्यास रेल्वे प्रशासनाने सुरुवात केली आहे. ‘लोकमत’ने दोनवेळा याबाबत प्रसिद्ध केलेल्या सविस्तर वृत्तामुळे त्याची दखल घेत रेल्वे प्रशासनाने किमान रस्त्याचे कॉँक्रिटीकरण पूर्ण केले आहे. परंतु जेथे १०० मीटरपर्यंत कॉँक्रिटीकरण आवश्यक होते, त्याऐवजी केवळ पुलाखाली जेथे पाणी साचून दलदल होत होती तेथेच कॉँक्रिट रस्ता पूर्ण केला आहे.
बेळंकी येथून खटाव, जानराववाडी, लिंगनूर व संतोषवाडी परिसराकडे जाणाऱ्या या महत्त्वपूर्ण रस्त्यावर बेळंकी गावाबाहेर रेल्वे पुलाखालील रस्त्याची दुरवस्था झाली होती. येथे यंदाच्या पावसाळ्यातील चार महिने प्रवासी व वाहनधारकांना याचा त्रास सोसावा लागला होता. याबाबत ‘लोकमत’ने दोनवेळा आवाज उठविला होता. त्यानंतर आता रेल्वे प्रशासनाने याची दखल घेत रेल्वे पुलाखालील जेथे पाणी साचत होते, त्या रस्त्याचे कॉँक्रिटीकरण केले आहे. त्यामुळे वाहनधारकांतून काहीसे समाधान व्यक्त होत आहे.
परंतु पुलाखालील रस्ता काँक्रिट करण्याबरोबरच तो डांबरी रस्त्यापर्यंत केला असता तर, चिखलाचा व
खड्ड्यांचा प्रश्नच शिल्लक राहिला
नसता. मात्र कॉँक्रिट रस्त्याच्या पुढे डांबरीपर्यंत पुन्हा चिखल तयार होऊ शकतो. हा रस्ताही पूर्ण व्हावा, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)