बेळगाव पॅसेंजरमध्ये महिलेचे एक लाखाचे दागिने लंपास
By admin | Published: July 21, 2014 11:54 PM2014-07-21T23:54:34+5:302014-07-21T23:54:34+5:30
पोलिसांत तक्रार : गर्दीचा फायदा घेऊन चोरीचा प्रकार
मिरज : मिरज-बेळगाव पॅसेंजर रेल्वेत अर्चना नितीन नाईक (वय २५, रा. गोकाक) यांची एक लाख रुपये किमतीचे दागिने असलेली पर्स चोरट्यांनी लंपास केली.
नाईक यांचे पती गोकाक येथे नोकरीस आहेत. नाईक त्यांच्या माहेरी शिगाव (ता. वाळवा) येथे जाण्यासाठी बेळगाव-मिरज पॅसेंजरने येण्यासाठी रेल्वेस्थानकावर आल्या होत्या. त्यांनी त्यांच्याजवळील सोन्याची चेन, नेकलेस, ठुशी, एक जोड टॉप्स, एक जोड झुबे, अंगठी असे चार तोळे वजनाचे दागिने एका छोट्या पर्समध्ये ठेवून ही पर्स खांद्याला अडकविलेल्या मोठ्या पर्समध्ये ठेवली होती. रेल्वेत चढताना गर्दीत अज्ञाताने त्यांच्या मोठ्या पर्सची चेन उघडून आतील दागिने असलेली लहान पर्स लंपास केली. रेल्वेत बसल्यानंतर नाईक यांनी पर्स तपासली असता, त्यांना लहान पर्स चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी रेल्वेत शोधाशोध केली, मात्र पर्स सापडली नाही. याबाबत त्यांनी मिरज रेल्वे पोलिसांत फिर्याद दिली आहे. (वार्ताहर)