बिळूरला काँग्रेसविरोधात राष्ट्रवादी, भाजपचा शड्डू
By admin | Published: January 17, 2017 12:17 AM2017-01-17T00:17:36+5:302017-01-17T00:17:36+5:30
तिरंगी लढतीची शक्यता : राष्ट्रवादी आघाडीसाठी प्रयत्नशील; विविध पक्षांच्या नेत्यांच्या बैठका सुरू
जयवंत आदाटे ल्ल जत
जत तालुक्यातील बिळूर गावात राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या तालुकाध्यक्षांचे वास्तव्य असल्याने बिळूर जिल्हा परिषद गटाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपनेही जोरदार तयारी केल्याने कॉँग्रेस, भाजप व राष्ट्रवादी अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीची स्वतंत्र निवडणूक लढविण्याची तयारी नाही, त्यामुळे स्थानिक पातळीवर आघाडीसाठी त्यांनी कॉँग्रेस व भाजपसोबत चर्चा करण्याची तयारी ठेवली आहे.
बिळूर जिल्हा परिषद मतदारसंघ महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात येतो. येथे मोठ्या प्रमाणात द्विभाषिक मतदार आहेत. पुनर्रचनेत मतदार संघात बदल झाला आहे. पूर्वी या मतदार संघात अकरा गावांचा समावेश होता. त्यातील येळदरी व खोजानवाडी ही दोन गावे कमी करून नऊ गावांचा मतदारसंघ करण्यात आला आहे.
बिळूर गटात बिळूर, साळमळगेवाडी, एकुंडी, खिलारवाडी, वज्रवाड, गुगवाड, बसरगी, सिंदूर, उमराणी या नऊ गावांचा समावेश करण्यात आला आहे.
बिळूर जिल्हा परिषद मतदारसंघ सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. या मतदार संघातून महानंदा शिवाप्पा तावशी, कमल जाबगोंड, मंगल आप्पासाहेब नामद या तीन उमेदवारांनी भाजपकडे उमेदवारीची मागणी केली आहे. यामध्ये कोणाला लॉटरी लागणार, हे येत्या आठ दिवसात निश्चित होणार आहे.
विद्या लक्ष्मण जकगोंड, विमलबाई आप्पासाहेब पाटील, बाळाक्का बसगोंडा जकगोंड, शांताबाई बसगोंडा जकगोंड हे चार उमेदवार काँग्रेस पक्षाकडून इच्छुक आहेत.
बिळूर पंचायत समिती गण नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहे. यात पाच गावांचा समावेश आहे. डॉ. राजेश जिवन्नवार (भाजप), अण्णासाहेब गडीकर (भाजप), रामाण्णा जिवन्नवार (भाजप), भैराप्पा मासाळ (कॉँग्रेस), रवींद्र करेन्नवार (राष्ट्रवादी), शिवानंद धोडमाळ (कॉँग्रेस), महादेव धोडमणी (कॉँग्रेस), शिवानंद धोडमणी (राष्ट्रवादी), महातेश गडीकर (कॉँग्रेस), अविनाश गडीकर (कॉँग्रेस) यांची नावे चर्चेत आहेत.
उमराणी पंचायत समिती गण सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. यात चार गावांचा समावेश करण्यात आला आहे. महानंदा शिवाप्पा तावशी (भाजप), महानंदा इराप्पा तावशी (भाजप) यांच्यासह श्रीशैल मगदूम (कॉँग्रेस), आप्पासाहेब नामद (भाजप), मल्लेशी कत्ती (कॉँग्रेस), गंगाप्पा मगदूम (राष्ट्रवादी), चंदू पाटील (कॉँग्रेस) यांच्या पत्नींची नावे चर्चेत आहेत.
कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष पी. एम. पाटील व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अॅड. बी. ए. धोडमणी यांचे बिळूर गावातच वास्तव्य असते. आजपर्यंत या मतदार संघावर पी. एम. पाटील यांचा वरचष्मा राहिला आहे. परंतु नुकत्याच झालेल्या बिळूर सोसायटीच्या निवडणुकीत पाटील यांना हार पत्करावी लागली आहे. आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सत्ता हस्तगत केली आहे. त्यामुळे आगामी जि. प. व पं. स. निवडणुकीत बिळूर गट पाटील यांना तारणार का?, याची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीची स्वतंत्र निवडणूक लढविण्याची तयारी नाही, त्यामुळे स्थानिक पातळीवर आघाडीसाठी त्यांनी कॉँग्रेस व भाजपसोबत चर्चा करण्याची तयारी ठेवली आहे. माजी मंत्री जयंत पाटील यांनी जत तालुका दौऱ्यात तशा सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत, असे समजते.