पैशाच्या वादातून बेणापूरच्या तरुणाचे भरदिवसा खानापुरातून अपहरण, दोघा संशयितांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2022 01:24 PM2022-12-03T13:24:16+5:302022-12-03T13:24:39+5:30
या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली
विटा : उसने पैशाच्या देवाणघेवाणीवरून खानापूर तालुक्यातील विठ्ठलनगर (बेणापूर) येथील उदय आनंदराव भोसले (वय ३८) या तरुणाचे खानापूर येथून भरदिवसा अपहरण करण्यात आले. ही घटना गुरुवार, दि. १ डिसेंबर रोजी दुपारी १२:३० वाजता घडली. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली असून, याप्रकरणी गब्बर ऊर्फ प्रताप ज्ञानू करचे (रा. पाचेगाव, ता. सांगोला, जि. सोलापूर) व अन्य एक अनोळखी, अशा दोघांविरुद्ध विटा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उदय भोसले हा तरुण गेल्या चार ते पाच महिन्यांपासून व्यावसायानिमित्त परराज्यात आहे. उदय यांनी पाचेगाव येथील गब्बर ऊर्फ प्रताप करचे याच्याकडून हातउसने पैसे घेतले होते. ते त्यांनी अद्याप परत केले नव्हते. त्यामुळे उदय हे गेल्या महिन्यात गावी विठ्ठलनगर येथे आल्यानंतर संशयित गब्बर याने त्या तरुणाची भेट घेऊन पैसे देण्याची मागणी केली होती.
त्यावेळी या दोघांत बोलणी होऊन पैसे देण्या-घेण्याबाबत निर्णय झाला होता. त्यानंतर उदय भोसले हे परत परराज्यात गेले. दि. ३० नोव्हेंबर रोजी भोसले हे गावी विठ्ठलनगर येथे आले होते. गुरुवारी उदय हे खानापूरला गेल्यानंतर यश कॉम्प्युटर दुकानासमोर थांबले असताना गब्बर ऊर्फ प्रताप करचे व त्याचा साथीदार दुचाकी घेऊन त्याठिकाणी आले.
त्यावेळी या दोघांनी पती उदय यांना दुचाकीवर बसवून त्याला पळवून नेल्याबाबतची तक्रार त्यांची पत्नी छाया भोसले यांनी गुुरुवारी विटा पोलिसांत दिली. उपनिरीक्षक जालिंदर जाधव पुढील तपास करीत आहेत.