आधी खंडपीठ निश्चिती, मग सुनावणी

By Admin | Published: January 26, 2016 01:01 AM2016-01-26T01:01:02+5:302016-01-26T01:01:30+5:30

तासगाव कारखाना : गणपती संघाच्या याचिकेवर सुनावणी

The bench confirmed beforehand, then the hearing | आधी खंडपीठ निश्चिती, मग सुनावणी

आधी खंडपीठ निश्चिती, मग सुनावणी

googlenewsNext

तासगाव : तासगाव साखर कारखान्याच्या एकूण कर्जाच्या २५ टक्के रक्कम अवसायकांनी भरावी, या डीएआरटी न्यायालयाच्या आदेशाबाबत तसेच विक्री व्यवहार कायम होऊन मिळावा, या गणपती संघाच्या याचिकेवरची सुनावणी सोमवारी पुन्हा लांबणीवर पडली. हा विषय सिक्युरिटायझेशन कायद्यांतर्गत असल्याने याच्या सुनावणीबाबत खंडपीठाची
निश्चिती करून दोन्ही याचिका सुनावणीसाठी ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती ए. ए. सय्यद यांनी हा आदेश दिला.
तुरची येथील तासगाव-पलूस सहकारी साखर कारखान्याच्या कर्जाच्या २५ टक्के रक्कम अवसायकांनी भरावी, असे आदेश मुंबई येथील डीएआरटी न्यायालयाने दिले होते. या आदेशाला अवसायकांनी हरकत घेऊन उच्च न्यायालयाकडून स्थगिती घेतली होती. याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
दुसरीकडे गणपती जिल्हा सहकारी संघाकडूनही विक्री व्यवहार कायम होऊन मिळावा, यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. या दोन्ही याचिकांबाबत उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नरेश पाटील आणि न्यायाधीश ए. ए. सय्यद यांच्यासमोर सुनावणी झाली.
अवसायकांच्यावतीने अ‍ॅड. उमेश माणकापुरे यांनी बाजू मांडली. विक्री व्यवहाराबाबतीत अंतिम निर्णय न झाल्याने कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यासाठीची प्रक्रिया थांबली असल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यावर हा विषय सिक्युरिटायझेशन कायद्यांतर्गत येत असल्याने कोणत्या खंडपीठासमोर सुनावणीसाठी घ्यावा, याची पडताळणी करून त्यानंतर दोन्हीही याचिका संबंधित खंडपीठासमोर सुनावणीसाठी ठेवण्यात याव्यात, असे आदेश न्यायालयाने दिले. (वार्ताहर)
पाठपुरावा करणार
दरम्यान, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रजिस्ट्रार यांच्यासमोर पाठपुरावा करून सुनावणी लवकर होण्यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी माहिती तासगाव साखर कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक आर. डी. पाटील यांनी दिली.

Web Title: The bench confirmed beforehand, then the hearing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.