४५ वर्षांवरील लाभार्थ्यांना दुसऱ्या डोससाठी पंधरा दिवसांचे ‘वेटिंग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:26 AM2021-05-15T04:26:11+5:302021-05-15T04:26:11+5:30
सांगली : पुरेशा प्रमाणात लसीचा पुरवठा होत नसल्याने लाभार्थ्यांची प्रतीक्षा यादी लांबत चालली आहे. ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांना लसीसाठी १५ ...
सांगली : पुरेशा प्रमाणात लसीचा पुरवठा होत नसल्याने लाभार्थ्यांची प्रतीक्षा यादी लांबत चालली आहे. ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांना लसीसाठी १५ दिवसांचे ‘वेटिंग’ आहे. १ मेरोजी नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना शुक्रवारी (दि.१४) लस देण्यात आली. दरम्यान, शुक्रवारी कोव्हॅक्सिनचे २००० डोस मिळाले.
सध्या फक्त ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्याचे काम सुरु आहे. शुक्रवारअखेर या वयोगटातील २ लाख २९ हजार ४६ नागरिकांचे पहिल्या टप्प्याचे लसीकरण पूर्ण झाले होते, त्यातील फक्त २८ हजार ५३ जणांना दुसरा डोस मिळाला आहे. शासनाने दुसऱ्या डोसला प्राधान्य दिले आहे, त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र हाच डोस देण्याचे काम सुरु आहे. शुक्रवारी थोडीच लस शिल्लक होती, त्यातून १,१५९ जणांना दुसरा डोस मिळाला. १४५ जणांना पहिला डोस मिळाला. ६० वर्षांवरील १,६४६ जणांना दुसरा डोस देण्यात आला. १८ ते ४५ वयोगटाला एकही डोस मिळाला नाही. दिवसभरात ३,२४८ जणांचे लसीकरण झाले. शुक्रवार अखेरचे लसीकरण ६ लाख ४५ हजार ४७५ वर पोहोचले आहे.
चौकट
नंबर आला की फोन येईल!
दरम्यान, महापालिकेच्या प्रत्येक शहरी आरोग्य केंद्राला १०० ते २०० लसीच मिळत आहेत. त्यामुळे लसीकरण थंडावले आहे. लसीसाठी येणाऱ्या लाभार्थ्यांची यादी तयार केली जात आहे. लस येईल त्यानुसार त्यांना निरोप दिला जात आहे. १ मे रोजी नाव नोंदविलेल्या नागरिकांचा शुक्रवारी लसीकरणासाठी क्रमांक आला.