आॅनलाईन नोंद नसणाऱ्या लाभार्थ्यांना धान्य नाहीच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 05:04 PM2020-04-15T17:04:51+5:302020-04-15T17:05:53+5:30
दुकान उघडायला लावून धान्य वितरण सुरू केले. प्रकृती बरी नसल्याने दुकान बंद ठेवल्याचे दुकानदाराने सांगितले.शिधापत्रिकेद्वारे मिळणारा तांदूळ चांगल्या प्रतीचा आहे. गहू मात्र अस्वच्छ असल्याच्या तक्रारी काही लाभार्थ्यांनी केल्या.
सांगली : लॉकडाऊनमध्ये स्वस्त धान्य दुकानांतून मिळणाºया धान्याने सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. मात्र वितरण प्रणालीसंदर्भात काही प्रमाणात तक्रारीही येत आहेत. शिधापत्रिकेत नावे असूनही आॅनलाईन नोंद नसल्याने काही कुटुंबे धान्यापासून वंचित राहत आहेत.
लॉकडाऊनमुळे रोजगार हिरावलेल्या गरजूंच्या स्वस्त धान्य दुकानांसमोर रांगा लागत आहेत. यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. यातूनच दोन दिवसांपूर्वी मिरजेत दोन तरुणांमध्ये हाणामारीही झाली. फक्त मास्क घालून लोक गर्दी करत आहेत. ती नियंत्रित करण्यासाठी दुकानदारांनी दुकाने सकाळपासून रात्रीपर्यंत सुरू ठेवण्याच्या सूचना तहसीलदारांनी दिल्या आहेत.
बामणोली (ता. मिरज) येथे धान्य भरल्यानंतरही दुकान उघडले नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. त्यानंतर पुरवठा विभागातील अधिकारी स्वत: तेथे गेले. दुकान उघडायला लावून धान्य वितरण सुरू केले. प्रकृती बरी नसल्याने दुकान बंद ठेवल्याचे दुकानदाराने सांगितले.शिधापत्रिकेद्वारे मिळणारा तांदूळ चांगल्या प्रतीचा आहे. गहू मात्र अस्वच्छ असल्याच्या तक्रारी काही लाभार्थ्यांनी केल्या.
सोमवारी जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी जिल्ह्यातील बैठक घेऊन रेशन दुकानदारांना सुरळीत वितरणाच्या सूचना दिल्या. गैरप्रकार आढळल्यास कडक कारवाईचा इशारा दिला. यावेळी रेशनिंग दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुबारक मौलवी, उपाध्यक्ष बाळासाहेब सदलगे यांच्यासह नगरसेवक संतोष पाटील, मदिना बारुदवाले, रोहिणी पाटील, मनगु सरगर आदी उपस्थित होते.