लाभार्थींचा हिस्सा रिकामाच

By Admin | Published: November 6, 2014 10:27 PM2014-11-06T22:27:03+5:302014-11-06T23:00:58+5:30

आष्टा नगरपालिका : घरकुल योजना अंतिम टप्प्यात

Beneficiary part is empty | लाभार्थींचा हिस्सा रिकामाच

लाभार्थींचा हिस्सा रिकामाच

googlenewsNext

सुरेंद्र शिराळकर - आष्टा -आष्टा शहरात १७ कोटी २३ लाखांची ९५० घरकुलांची घरकुल योजना प्रगतिपथावर आहे. ९० टक्के घरांची कामे पूर्ण होऊनसुध्दा लाभार्थ्यांनी भरावयाची १० टक्के रक्कम अद्याप न भरल्याने पूर्ण झालेली घरकुले लाभार्थ्यांना देण्यात अडचण येत आहे.
आष्टा नगरीचे शिल्पकार माजी आमदार विलासराव शिंदे यांच्या प्रयत्नाने केंद्र शासनाच्या एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास योजनेंतर्गत (आय. एच. एस. डी. पी.) अंतर्गत आष्टा शहरातील काकासाहेब शिंदे, विलासराव शिंदे, गौतम, अण्णाभाऊ साठे, बुवा महाराज नंदिवाले, अहिल्यादेवी, उमाजी नाईक, जयंत बेघर व महात्मा गांधी हौसिंग सोसायटी या ९ हौसिंग सोसायट्यांमध्ये १२५६ घरकुलांची सुमारे १५ कोटी ९९ लाख खर्चाची घरकुल योजना २००७ मध्ये सुरू करण्यात आली. केंद्र शासन ८० टक्के, राज्य शासन १० टक्के व लाभार्थी १० टक्के याप्रमाणे सर्वांच्या सहकार्यातून राज्यातील ‘क’ वर्ग आष्टा पालिकेत ही योजना राबविण्यात येत आहे. म्हाडाच्या मार्गदर्शनाखाली आष्टा पालिकेने राबविलेल्या या योजनेची पंतप्रधान कार्यालयानेही दखल घेतली आहे. १२५६ पैकी ११८५ घरकुले पूर्ण झाली आहेत.
१२५६ घरकुलांची योजना सुरू असताना जून २०११ मध्ये आष्टा नगरपालिकेस १७ कोटी २३ लाखांची ९५० घरकुलांची घरकुल योजना मंजूर झाली. मुस्लिम, संतसेना, कोल्हाटी व इतर मागासवर्गीयांसाठी राज्यात प्रथमच घरकुल योजना मंजूर झाली.
केंद्र शासनाच्या आय. एच. एस. डी. पी. योजनेंतर्गत केंद्र शासन ८० टक्के, राज्य शासन १० टक्के व लाभार्थी १० टक्के असे या योजनेचे स्वरूप आहे. ९५० पैकी मुस्लिम समाजास ५७६, संत सेना महाराज ४४, कोल्हाटी समाजास १११ व इतर मागासवर्गीयांसाठी २६३ घरकुले मंजूर झाली. प्रत्येक लाभार्थ्याने लाभार्थी हिस्सा म्हणून पालिकेकडे ३५ हजार रुपये जमा करणे आवश्यक होते. मात्र यातील काही लाभार्थ्यांनी पूर्ण हिस्सा भरला आहे. काहींनी निम्मा, तर काहींनी पैसेच भरलेले नाहीत. त्यामुळे या योजनेतील उर्वरित घरकुले पूर्ण करताना अडचणी येत आहेत.
कोल्हाटी समाजातील १११ घरकुलांपैकी ८६ घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे.
आष्टा-सांगली रस्त्यावर एसटी स्टँडसमोर तीन मजली घरकुल योजना अंतिम टप्प्यात आहे, तर आष्टा-तासगाव रस्त्यावर पालिकेच्या जलशुध्दीकरण केंद्रासमोर मुस्लिम समाजाच्या ईदगाह मैदानाजवळील ४८ पैकी ४० इमारती पूर्ण झाल्या आहेत. मार्च २०१५ अखेर सर्व घरकुले पूर्ण करण्यात येणार आहेत. मात्र लाभार्थ्यांनी स्वत:चा हिस्सा न भरल्याने ही घरकूल योजनाच अडचणीत आली आहे.

मार्चपर्यंत घरकुलाचा ताबा : पाटील
२०११ मध्ये मुस्लिम, कोल्हाटी, संत सेना व इतर मागासवर्गीयांसाठी १७ कोटी २३ लाखांची ९५० घरकुलांची योजना केंद्र शासनाने मंजूर केली. केंद्र शासन ८० टक्के, राज्य शासन १० टक्के व लाभार्थी १० टक्के असे योजनेचे स्वरूप आहे. लाभार्थ्यांनी ३५ हजार भरलेले नाहीत. लाभार्थ्यांनी स्वत:चा पूर्ण हिस्सा भरावा. मार्च १५ अखेर ही योजना पूर्ण करणार आहोत, असे मत मुख्याधिकारी पंकज पाटील व्यक्त केले.

लाभार्थींनी योजना पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे : शिंदे
विलासराव शिंदे यांच्या प्रयत्नामुळे घरकुल योजना मंजूर झाली. घरकुल योजना गतीने सुरू आहे. लाभार्थ्यांची बैठक घेण्यात आली आहे. लाभार्थ्यांनीही योजना पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा मंगलादेवी शिंदे यांनी केले आहे.
अधिकाऱ्यांनी योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न केला; मात्र लाभार्थ्यांच्या असहकार्यामुळे योजना अडचणीत आली आहे. शहरात अजूनही अनेक गोरगरीब आहेत, जे सर्व घरकुल योजनेसाठी पात्र आहेत; परंतु त्यांना घरकुल मिळालेले नाही.

Web Title: Beneficiary part is empty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.