अत्युच्च तंत्रज्ञानाचा लाभ गरिबांना व्हावा : रघुनाथ माशेलकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 11:53 PM2018-11-01T23:53:23+5:302018-11-01T23:54:32+5:30
उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानातून महागडी निर्मिती उपयोगाची नाही. गरिबांसाठी त्याचा वापर झाला तरच त्या संशोधनाला अर्थ आहे. ज्ञान, तंत्रज्ञान आणि विश्वास यावर आधारित संशोधनच दर्जेदार म्हटले पाहिजे, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर
सांगली : उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानातून महागडी निर्मिती उपयोगाची नाही. गरिबांसाठी त्याचा वापर झाला तरच त्या संशोधनाला अर्थ आहे. ज्ञान, तंत्रज्ञान आणि विश्वास यावर आधारित संशोधनच दर्जेदार म्हटले पाहिजे, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनी गुरुवारी येथे व्यक्त केले.
येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात रसायन शास्त्राचे प्राध्यापक डॉ. बी. एन. कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित व्याख्यानमालेत माशेलकर यांचे ‘नव्या सर्जनशील भारताचे नवनिर्माण’ या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी व्यासपीठावर सागर देशपांडे, ट्रस्टचे अध्यक्ष अनिल कुलकर्णी व डॉ. श्रीकांत कुलकर्णी उपस्थित होते.
माशेलकर म्हणाले की, हळद आणि बासमतीच्या पेटंटचा लढा भारतीय या नात्याने दिला. प्रत्येकाने तत्त्वासाठी लढले, तर त्याचा फायदा होऊ शकतो. जगभरात अनेक प्रकारची संशोधने व त्यातून निर्मिती होत असताना, त्याबाबतचे ज्ञान हे फार पूर्वीपासून भारतात आपल्या पूर्वजांनी शोधले आहे. हीच गोष्ट लक्षात आल्यानंतर आपल्याकडील पारंपरिक ज्ञान एकत्रित करीत आम्ही ट्रॅडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररी तयार केली. चार कोटी पानांचे हे ई-ग्रंथालय आहे. जगात आता कुठेही पेटंट घेताना भारताच्या या ई-ग्रंथालयाची पाहणी प्रथम करावी लागते. त्यामुळे भारतात पारंपरिक ज्ञानाची कमतरता नाही. त्याचा अभिमान प्रत्येकाने बाळगावा. मात्र नुसता अभिमान बाळगण्यापेक्षा त्यातून नवनिर्मिती केली पाहिजे.
हळदीचे शहर म्हणून सांगलीला ओळखले जात असले तरी, नुसत्या हळद निर्मितीपेक्षा त्यातील करक्युमीनच्या निर्मितीचा ध्यास येथील व्यावसायिकांनी ठेवला पाहिजे. त्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. मनातील विचार मोठे असून उपयोग नाही, तर भारतीयांनी मानसिकता बदलली पाहिजे. जगात आपण सर्वांच्या पुढे जाण्याचा विचार जपला पाहिजे. त्यादृष्टीने वाटचाल केली पाहिजे.
जग वेगाने बदलत असताना शिक्षण पद्धतीही बदलणार आहे. तंत्रज्ञानातून प्रत्येक क्षेत्र बदलाच्या वेगवान वाऱ्यावर धावणार आहे. परंपरागत नोकºया जाताना नव्या वाटाही सापडतील. त्यामुळे संशोधन, नवे तंत्रज्ञान याच्याशी आपण नाते घट्ट केले पाहिजे. तंत्रज्ञान उच्च दर्जाचे असेल आणि त्याची किंमतही मोठी असेल, तर त्याचा काही उपयोग होणार नाही. उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेल्या गोष्टीचा वापर गरिबांसाठी झाला, तर त्याला अर्थ आहे, असे ते म्हणाले.
यावेळी ट्रस्टच्यावतीने डॉ. दत्ता शेटे, डॉ. तृषांत लोहार या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हनकर यांनी सूत्रसंचालन, अनिल कुलकर्णी यांनी प्रास्ताविक, तर डॉ. वर्षा पाटील यांनी आभार मानले.
तुमची नव्हे, प्रतिस्पर्ध्यांची गती मोजा
जागतिक पातळीवरील स्पर्धेत आपल्या गतीचे मोजमाप करून चालत नाही. प्रतिस्पर्ध्यांची गती किती आहे, हेही पाहिले पाहिजे. त्यावरच तुमच्या प्रगतीचे गणित अवलंबून आहे. जागतिक नवनिर्माण निर्देशांक (ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स) मध्ये भारताने प्रगती करीत आता ५७ वे स्थान मिळविले असले तरी, अन्य प्रगतशील देशांपेक्षा अधिक गतीने पुढे जाण्याची गरज आहे. त्यासाठी भारतातील नवनिर्माणाचा वेग वाढविला पाहिजे, असे माशेलकर म्हणाले.
सांगलीच्या मातीला नवनिर्माणाची परंपरा
विष्णुदास भावे, ग. दि. माडगूळकर, वसंतदादा पाटील, वि. स. पागे यांच्यासारख्या अनेक व्यक्तींनी सांगलीत नवनिर्माण केले. या मातीतच नवनिर्माणाची परंपरा आहे. अनेक दिग्गज लोकांनी येथील परंपरा समृद्ध केली आहे. त्यांच्या पश्चात नव्या पिढीने नवनिर्माणाच्या वाटेवरून अधिक गतीने पुढे गेले पाहिजे, असे माशेलकर म्हणाले.
सांगलीत गुरुवारी ‘नव्या सर्जनशील भारताचे नवनिर्माण’ या विषयावर ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डावीकडून श्रीकांत कुलकर्णी, अनिल कुलकर्णी, सागर देशपांडे आदी उपस्थित होते.