बंगळुरु-भगत की कोठी एक्स्प्रेसला सांगली, कराडमध्ये थांबा नाकारला
By अविनाश कोळी | Published: May 25, 2024 05:01 PM2024-05-25T17:01:11+5:302024-05-25T17:01:42+5:30
प्रवासी संघटनांकडून संताप : मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे तक्रार
सांगली : बंगळुरू-भगत की कोठी या उन्हाळी विशेष एक्स्प्रेसला एकूण प्रवासात ३७ थांबे मंजूर केले असताना सांगली व कऱ्हाड या उच्च उत्पन्नाच्या स्थानकावर थांबा नाकारण्यात आला आहे. त्यामुळे प्रवासी संघटनांमधून संताप व्यक्त करण्यात आला. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांच्याकडे याप्रकरणी संघटनांनी तक्रार केली आहे.
पुणे विभागीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीने याबाबत केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, बंगळुरू-भगत की कोठी एक्स्प्रेस (क्र. ०६५८७/०६५८८) या वातानुकूलित गाडीला सांगली व कऱ्हाडचा थांबा नाकारण्यात आला आहे. या गाडीच्या मार्गावरील ३७ स्थानकांवर थांबा मंजूर आहे, मात्र पुणे विभागातील सांगली आणि कऱ्हाड या जास्त उत्पन्न देणाऱ्या दोन स्थानकांवर थांबा दिला गेला नाही.
सांगली आणि कऱ्हाडच्या तुलनेत कमी उत्पन्नाच्या २५ स्थानकांवर या गाड्या थांबतात. सांगली आणि कऱ्हाडच्या जनतेवर हा अन्याय आहे. राजस्थान एसी ट्रेन क्रमांक १९६६८ साठी सांगली थांब्याचे प्रति फेरी उत्पन्न १ लाख रुपये आहे. राणी चेनम्मा एक्स्प्रेसचे सांगली स्टेशनचे दैनंदिन उत्पन्न १.२ लाख रुपये आहे. सांगली स्थानकातील मुंबई गाड्यांचे प्रति ट्रिप उत्पन्न ८० हजार रुपये प्रति फेरी इतके आहे. कराड स्थानकाचे विविध गाड्यांचे प्रति ट्रिप उत्पन्न सरासरी सुमारे ५० हजार रुपये आहे. हे उत्पन्न रेल्वेच्या लेखी खूप चांगले आहे. त्यामुळे या गाडीला सांगली व कऱ्हाड स्थानकावर थांबा द्यावा, अशी मागणी समितीचे सदस्य गोपाल तिवारी यांनी केली आहे.
प्रवाशांवर अन्याय का?
बंगळुरू-भगत की कोठी या उन्हाळी विशेष वातानुकूलित रेल्वे गाड्यांना मोठे उत्पन्न देणाऱ्या सांगली व कऱ्हाड रेल्वे स्टेशनवर थांबा देण्यात आला नसल्यामुळे सांगली व कऱ्हाड भागातील प्रवाशांची गैरसोय होत आहे. प्रवासी संघटनांनी याविषयी नाराजी व्यक्त केली. सांगलीच्या स्थानकावर वारंवार असा अन्याय का केला जात आहे, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.