नरसिंहगावच्या वाटमारीची चुलत भावानेच दिली सुपारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:30 AM2021-08-21T04:30:09+5:302021-08-21T04:30:09+5:30
कवठेमहांकाळ : नरसिंहगाव (ता. कवठेमहांकाळ) नजीक रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर ११ ऑगस्ट रोजी झालेल्या वाटमारीतील नऊ संशयित आरोपींना गुरुवारी जेरबंद ...
कवठेमहांकाळ : नरसिंहगाव (ता. कवठेमहांकाळ) नजीक रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर ११ ऑगस्ट रोजी झालेल्या वाटमारीतील नऊ संशयित आरोपींना गुरुवारी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले. त्यांच्याकडून चोरीतील तीन लाखांची रोकड, तीन दुचाकींसह हत्यारे जप्त केली आहेत. फिर्यादी गणेश साबू मादगीर यांच्या चुलत भावानेच या प्रकरणी सुपारी दिल्याचे उघड झाले आहे.
महेश श्रीकांत माने (वय २५, रा. अष्टविनायक नगर, सांगली), नितीन गजानन जाधव (२६, रा. पत्रकारनगर, सांगली), प्रदीप सदाशिव अथणीकर (२६, रा. सावंत प्लॉट, मिरज), विशाल भीमराव बनसोडे (२७, रा. टाकळी, ता. मिरज), आशुतोष रवींद्र वाघमारे (२३, मिरज), आनंदा तानाजी कांबळे (२४, टाकळी, ता. मिरज), अभिषेक सुरेश मगदूम (२२, रा. मिरज), ऋषिकेश जयसिंग सुतार (२५, रा. सांगली), रवी गोपाळ मादगीर (३४ रा. चांदणी चौक, सांगली) यांना कवठेमहांकाळ पोलिसांच्या ताब्यात देऊन गुन्हा दाखल केला आहे.
गणेश साबू मादगीर सांगली येथील पारेख यांच्या दुकानात वसुलीचे काम करतात. ही माहिती गणेश मादगीर यांचा चुलत भाऊ रवी मादगीर याने महेश माने यास दिली होती. यावेळी त्यांनी गणेश मादगीर यांना लुटण्याचा इरादा केला होता. यासाठी महेश मानेने सांगली आणि मिरजेतील आठजणांना एकत्र केले. चोरीतील ३० टक्के वाटा रवी मादगीर याला व उर्वरित ७० टक्के वाटा या आठ जणांना देण्याचे ठरले.
यानुसार ११ ऑगस्ट रोजी गणेश मादगीर नियमित वसुली करून चालकासह जतहून मिरजला मोटारीने (क्र. एमएच ९६४८) येत होते. रत्नागिरी-नागपूर महामार्गावर नरसिंहगावनजीक तीन दुचाकीवरून संशयित आले. त्यांनी मादगीर यांची मोटार अडवली. चालक राजाराम शिंदे यांना मारहाण करत हत्यारांचा धाक दाखवत तीन लाखांची रोकड लंपास केली.
या प्रकरणाचा तपास सुरू असताना संशयित आरोपी गुरुवारी सायंकाळी मिरजेतून पलायन करणार असल्याची माहिती सांगलीच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळाली. यानुसार मिरजेतील पशुवैद्यकीय रुग्णालयानजीक छापा टाकून आठ संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चाैकशी केली असता चोरीची कबुली दिली.
स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस, आर्यन देशिंगकर, संदीप नलवडे, दीपक गायकवाड, अनिल कोळेकर, सचिन धोत्रे, अमोल एदाळे, सहायक पोलीस फौजदार सुभाष सूर्यवंशी, कुबेर खोत, आमसिद्ध खोत, सागर टिगरे यांनी कारवाईत भाग घेतला.