महापुरानंतर उद्भवणाऱ्या आजारांपासून राहा सावधान! : सांगलीतील तज्ज्ञांचा सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 11:32 PM2019-08-13T23:32:38+5:302019-08-13T23:35:01+5:30
सांगली जिल्ह्यात यंदा मिरज, पलूस, वाळवा, शिराळा या चार तालुक्यातील १0१ गावांना महापुराचा विळखा होता. तीन ते साडेतीन लाख लोकवस्तीला याचा फटका बसला आहे. महापूर ओसरत असताना आता व्हायरल व बॅक्टेरियल आजारांचे आक्रमण होण्याची शक्यता आहे.
सांगली : महापुराचे संकट आता कमी होत असताना, अनेक प्रकारच्या आजारांच्या संकटाचे ढग दाटले आहेत. वेळीच उपाय व काळजी घेतल्यास यावर मात करता येणे शक्य आहे. त्यामुळे एकीकडे शासकीय आरोग्य विभाग मोहीम सुरू करीत असताना, नागरिकांनीही स्वत:च्या आरोग्याबाबत वेळीच उपाय केले पाहिजेत, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले.
सांगली जिल्ह्यात यंदा मिरज, पलूस, वाळवा, शिराळा या चार तालुक्यातील १0१ गावांना महापुराचा विळखा होता. तीन ते साडेतीन लाख लोकवस्तीला याचा फटका बसला आहे. महापूर ओसरत असताना आता व्हायरल व बॅक्टेरियल आजारांचे आक्रमण होण्याची शक्यता आहे. महापुरानंतर अतिसार, लेप्टोस्पायरोसिस, कावीळ ए आणि ई, डेंग्यू, श्वसनविकार, त्वचाविकार यांचा सामना नागरिकांना करावा लागण्याची शक्यता आहे. अशावेळी संबंधित आजारांची लक्षणे दिसताच नागरिकांनी तातडीने वैद्यकीय मदत घेण्याची गरज आहे. कोणत्याही प्रकारच्या आजाराकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते.
आजार, लक्षणे आणि उपाय...
अतिसार : पाण्याच्या सततच्या संपर्कामुळे महापुरानंतर किंवा या कालावधितच अतिसार होऊ शकतो. तापासह किंवा तापाविना पातळ संडास होणे, ही याची प्रमुख लक्षणे आहेत. यावर वैद्यकीय उपचार घेतानाच पाणी उकळून शुद्ध करून प्यावे
लेप्टोस्पायरोसिस : अशुध्द पाण्यामुळे लेप्टोस्पायरोसिसची लागण होते. जळजळ होणे, अंगदुखी, डोकेदुखी, ताप ही सर्वसाधारण लक्षणे असल्यास लेप्टोस्पायरोसिस ओळखावा. जर तुमच्या शरीरावर कुठेही कापलेले किंवा जखम असेल आणि तुमचा संपर्क पुराच्या पाण्याशी झाल्यास प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कोणत्याही लक्षणांची वाट न पाहता ओषधोपचार करून घेणे आवश्यक. हा ताप पाच ते सात दिवस राहिला तर रक्तचाचणीद्वारे याचे निदान केले जाते. महिनाभर खाण्यापिण्याचे पथ्य पाळले तर पुन्हा उद्भवत नाही. यावर दोनशे मिलिग्रॅमची डॉक्सिसायक्लिन गोळी आठवड्यातून एकदा पूर असेपर्यंत ंिकवा शंभर मिलिग्रॅमची गोळी सात दिवस दोनवेळा घ्यावी.
कावीळ : अशुध्द पाणी व अन्न यामुळे पावसाळ्यात कावीळ हा आजार होऊ शकतो. कावीळ मुख्यत्वे विषाणू ए आणि ईमुळे होते. थकवा, लघवीचा व डोळ्यांचा रंग पिवळसर होणे, उलटी, यकृतामध्ये बिघाड आदी लक्षणे दिसून आल्यास तपासणी करावी. डोळे लालसर होणे हेही एक लक्षण आहे. पाणी उकळून शुद्ध करून प्यावे व स्वच्छ, ताजे अन्न खावे.
श्वसनविकार : या आजारात संसर्गजन्य श्वसन विकार दिसून येतात. हात व शरीर स्वच्छ ठेवण्याबाबत काळजी घ्यावी. श्वसनासंदर्भात कोणताही आजार दिसल्यास तातडीने उपचार घ्यावेत.
डेंग्यू : ताप, डोकेदुखी यासारखी लक्षणे या आजारात दिसून येतात. पुरानंतरच्या पाण्याचा स्पर्श होऊ न देणे व शरीर स्वच्छ ठेवणे. त्याचबरोबर आजाराची लक्षणे दिसल्यास तातडीने उपचार घ्यावेत.
महापुराने निम्मा सांगली जिल्हा ग्रस्त आहे. सध्या पूर ओसरत असताना आजारापासून बचावाची मोठी जबाबदारी सर्वांवर आहे. आरोग्य यंत्रणा काम करीत असतानाच नागरिकांनी आजाराची लक्षणे दिसताच तातडीने वैद्यकीय तज्ज्ञांची मदत घ्यावी. पाणी उकळून पिणे, स्वच्छ अन्न खाणे, बाहेर फिरताना मास्कचा वापर करणे या पद्धतीने आरोग्याची पूर्ण काळजी नागरिकांनी घ्यावी.
- डॉ. अनिल मडके, श्वसनविकार तज्ज्ञ, सांगली
सांगलीत महापुरानंतर रस्त्याकडेला कचºयाचे ढीग साचले असून नागरिकही घरांची स्वच्छता करत असताना तेथे कचरा आणून टाकत आहेत. त्यामुळे जंतुसंसर्गाचा धोका वाढला आहे.