पावसाळ्यात सापांपासून सावधान; सांगली जिल्ह्यात विषारी सापांच्या तीन प्रजाती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:18 AM2021-06-17T04:18:42+5:302021-06-17T04:18:42+5:30
सांगली : उन्हाळा संपून पावसाळ्याची चाहुल लागली आहे. या कालावधीत दलदल निर्माण होऊन शेतात, घरात साप आढळून येतात. ...
सांगली : उन्हाळा संपून पावसाळ्याची चाहुल लागली आहे. या कालावधीत दलदल निर्माण होऊन शेतात, घरात साप आढळून येतात. जिल्ह्यात विषारी सापांच्या केवळ तीन प्रजाती आढळून येतात. त्यामुळे साप बघितल्यानंतर घाबरून न जाता सर्पमित्रांच्या मदतीने त्याला नैसर्गिक अधिवासात सोडावे, असा सल्ला सर्पमित्रांनी दिला आहे.
शेतकऱ्याचा मित्र अशीच सापाची ओळख आहे. मात्र, गैरसमजुतीमुळे बहुतांशजण सापाला मारुन टाकतात. जिल्ह्यात आढळणाऱ्या सापांमध्ये बिनविषारी सापांचे प्रमाण सर्वाधिक आहे तर नाग, घोणससारखे विषारी साप आढळून येत असले तरी त्यांचे प्रमाण तुलनेने कमी आहे. शेतात अथवा घरात साप आढळल्यास तातडीने सर्पमित्राची मदत घेतल्यास पुढील अनर्थ टळतो.
चौकट
जिल्ह्यात आढळणारे बिनविषारी साप
जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती वेगळी असल्याने वेगवेगळे साप आढळून येतात. बिनविषारी सापांमध्ये जिल्ह्यात धामण प्रजाती सर्वाधिक आढळून येते. अत्यंत चपळ व पकडण्यासाठी आव्हान असलेला हा साप चावल्यास कोणतीही इजा होत नाही. त्यामुळे धामण आढळल्यास घाबरुन न जाता त्याला सर्पमित्रांच्या मदतीने पकडून सोडून द्यावे.
चौकट
साप चावला तर...
* साप चावल्यानंतर तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चावलेल्या ठिकाणचे रक्त प्रवाहित केल्यास पुढील त्रास कमी होतो.
* दंश झाल्यानंतर साप विषारीच आहे, असे समजून घाबरू नये. जिल्हा रुग्णालयात उपचाराची चांगली सोय आहे.
चौकट
साप आढळला तर...
* साप आढळल्यास त्याला मारण्याऐवजी तातडीने सर्पमित्रांशी संपर्क साधावा.
* घरात, शेतात आढळणारा प्रत्येक साप हा विषारीच असतो असा भ्रम न करुन घेता, त्याला परत निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यासाठी प्रयत्न करावेत. घराच्या खिडक्या, दरवाजे उघडे ठेवावेत.
* कोणताही साप हा एकाच ठिकाणी कधीच थांबून राहत नाही. त्यामुळे नागरिकांनी त्याला न मारता पकडून इतर ठिकाणी सोडावे किंवा त्याला जाण्यासाठी मार्ग मोकळा केल्यास अनर्थ टळणार आहे.
चौकट
जिल्ह्यात आढळणारे साप
नाग - जिल्ह्यात आढळणाऱ्या विषारी सापांमध्ये सर्वाधिक नाग सापडतात. यातही दोन प्रकार असून, हा साप चावण्यापूर्वी फणा काढत असल्याने व फुत्कारत असल्याने लगेच लक्षात येते.
घोणस - पाणी अथवा ओलसर ठिकाणी शक्यतो हा साप आढळतो. अत्यंत संथपणे येऊन हा चावत असल्याने अशाठिकाणी जाताना काळजी घ्यावी. थंडीमध्ये हा साप जास्त आढळून येतो.
मण्यार - जिल्ह्याच्या पश्चिम भागात हा साप आढळतो. याचे प्रमाण नगण्य असले तरी तो अत्यंत विषारी समजला जातो. कीटक खाण्यासाठी हा बाहेर येतो. हिरवाई असलेल्या ठिकाणी हा जास्त आढळतो.
फुरसे - जिल्ह्यात घनदाट झाडी असलेल्या भागात फुरसे साप आढळतो. घातक व विषारी साप असलेल्या याचा अधिवास शहरातही आढळून आलेला आहे.
कोट
साप चावल्यास न घाबरता प्रथमोपचार सुरु करावेत. शेतकऱ्यांनी हातात काठी घेऊनच व बूट घालूनच काम करावे. जेणेकरुन दंश होणार नाही. सापांना न मारता सर्पमित्रांना सांगावे.
- अमोल पाटील, सर्पमित्र, आयुष सेवाभावी संस्था