धनंजय पाटील यांना भगवानराव पाटील पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:19 AM2021-02-05T07:19:05+5:302021-02-05T07:19:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क विटा : क्रांतिवीर भगवानराव पाटील (बप्पा) जन्मशताब्दी समिती व खानापूर-कडेगाव मराठी साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणारा क्रांतिवीर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : क्रांतिवीर भगवानराव पाटील (बप्पा) जन्मशताब्दी समिती व खानापूर-कडेगाव मराठी साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणारा क्रांतिवीर भाई भगवानराव पाटील सामाजिक पुरस्कार यावर्षी उस्मानाबादचे पुरोगामी विचारांचे सामाजिक कार्यकर्ते भाई धनंजय पाटील यांना जाहीर करण्यात आला. १२ फेब्रुवारी रोजी हणमंतवडिये येथे या पुरस्काराचे वितरण आहे, अशी माहिती अॅड. सुभाष पाटील यांनी दिली.
ते म्हणाले, हणमंतवडिये येथील क्रांतिवीर भगवानराव पाटील जन्मशताब्दी समिती व साहित्य परिषदेच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी उस्मानाबादचे जिल्ह्याचे शेकाप व राजर्षी छत्रपती शाहू शिक्षण संस्थेचे चिटणीस भाई धनंजय पाटील यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. शेकापचे लढवय्ये नेते, हैद्राबाद मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्य सेनानी आणि शेती प्रश्नाचे गाढे अभ्यासक भाई उध्दवराव पाटील यांचे धनंजय पाटील हे पुत्र आहेत.
धनंजय पाटील हे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या तसेच दुष्काळी प्रश्नांवर सतत संघर्ष करीत आहेत. त्यांनी चालविलेली राजर्षी शाहू शिक्षण संस्था ही अत्यंत चांगली संस्था आहे. सामाजिक बांधिलकी जोपासत गेली ४० ते ४५ वर्षे ते डाव्या पुरोगामी विचाराने कार्यरत आहेत. शेकापचा विचार आणि लाल झेंडा लहानपणापासून त्यांच्या हातात आहे. तो वारसा त्यांनी अखंडपणे सुरू ठेवला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन भाई धनंजय पाटील यांना क्रांतिवीर भगवानराव पाटील सामाजिक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. १२ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता हणमंतवडिये येथे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, आ. अनिल बाबर, आ. अरुण लाड यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.