भिलवडीत पेट्रोल पंप सील
By admin | Published: July 14, 2017 12:25 AM2017-07-14T00:25:40+5:302017-07-14T00:25:40+5:30
भिलवडीत पेट्रोल पंप सील
लोकमत न्यूज नेटवर्क
तासगाव/भिलवडी : मापात पाप करणाऱ्या जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडून छापे टाकण्याची मोहीम गुरुवारीही सुरूच होती. भिलवडी (ता. पलूस) येथे कृष्णा एजन्सीज व तासगाव येथील दत्तमाळावरील संतोष या दोन पंपांवर पथकाने छापा टाकला. भिलवडीतील पंप पाच दिवसांसाठी सील करण्यात आला आहे, तर तासगावला रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरू होती. त्यामुळे कारवाईचा तपशील मिळू शकला नाही.
ठाण्यातील पथकाने तरुणांच्या टोळीला ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून पेट्रोल पंपाच्या यंत्रात फेरफार करून ग्राहकांना इंधन कमी दिल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यभर या मायक्रोचिपच्या सुट्या भागाचा पुरवठा केला आहे. त्यांनी दिलेल्या नावांच्या आधारे राज्यभर छापासत्र सुरू आहे. भिलवडीत तासगाव रस्त्यालगत ए. एम. पाटील यांच्या मालकीचा कृष्णा एजन्सीज हा पंप आहे. गुरुवारी दुपारी ठाण्याच्या पथकाने अचानक छापा टाकला. सलग पाच तास पंपाच्या सर्व यंत्रणेची तपासणी केली. यामध्ये पल्सर की बोर्ड व मदर बोर्ड ही दोन यंत्रे तपासणीसाठी ताब्यात घेतली आहेत. ही दोन्ही यंत्रे पुढील तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आली. तपासणीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. तोपर्यंत पंपावरील पेट्रोल विक्री बंद रहावी, यासाठी हा पंप सील करण्यात आला आहे. १७ जुलै रोजी तपासणीचा अहवाल मिळेल, त्यानंतर पुढील आदेश दिले जातील, असे पोलीस निरीक्षक यशवंत चव्हाण यांनी सांगितले.
भिलवडीतील कारवाई पूर्ण झाल्यानंतर पथकाने तासगावमध्ये दत्तमाळावरील संतोष पेट्रोल पंपावर सायंकाळी सहा वाजता छापा टाकला. रात्री उशिरापर्यंत पेट्रोल विक्रीच्या यंत्राची तपासणी सुरू होती. या कारवाईत अधिकारी व कर्मचारी असे २० जणांचे पथक सहभागी झाले होते. पथकाचे प्रमुख निरीक्षक चव्हाण म्हणाले की, कारवाईस रात्री खूप वेळ लागेल. यंत्रात आढळलेल्या दोषांबाबत संपूर्ण तपासणी झाल्यानंतरच समजेल.
आणखी पंप ‘रडार’वर : ठाण्याच्या पथकाने राज्यभर मापात पाप करणाऱ्या पंपांवर छापे टाकण्याची मोहीमच उघडली आहे. कोल्हापुरातील छापासत्र संपल्यानंतर पथकाने गेल्या दोन दिवसांपासून सांगली जिल्ह्यात कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत बागणी (ता. वाळवा), अंकली (ता. मिरज) व गुरुवारी भिलवडी (ता. पलूस) व तासगाव येथे छापे टाकले. आणखी काही पंप ‘रडार’वर आहेत.