Sangli: चिकुर्डेच्या स्मशानभूमीत भानामतीचा प्रकार, गाठोड्यात आढळली मुला-मुलींचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 11:42 AM2024-03-28T11:42:08+5:302024-03-28T11:42:37+5:30
ऐतवडे बुद्रुक : चिकुर्डे (ता. वाळवा) येथील स्मशानभूमीत जादूटोणा व भानामतीचा प्रकार उघडकीस आला आहे. पौर्णिमेच्या रात्री काळ्या रंगाच्या ...
ऐतवडे बुद्रुक : चिकुर्डे (ता. वाळवा) येथील स्मशानभूमीत जादूटोणा व भानामतीचा प्रकार उघडकीस आला आहे. पौर्णिमेच्या रात्री काळ्या रंगाच्या कपड्यात नारळ, बाहुली, लिंबू, हळद-कुंकू लावून मुलींचे व मुलांचे फोटो आढळले. भानामतीच्या या प्रकारामुळे गावामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने याप्रकरणी तपास करून संशयितांवर जादूटोणाविराेधी कायद्यानुसार कारवाईच्या मागणीचे निवेदन कुरळप पोलिसांना देण्यात आले.
चिकुर्डे ते देवर्डेदरम्यान मुख्य रस्त्यालगत गावची मुख्य स्मशानभूमी आहे. दोन दिवसांपूर्वी पौर्णिमेच्या रात्री येथील स्मशानभूमीच्या लोखंडी रॅकवर पाच ठिकाणी काळ्या कपड्यांमध्ये काहीतरी बांधून ठेवल्याचा ग्रामस्थांना संशय आला. काही ग्रामस्थांनी ही माहिती तंटामुक्त ग्राम समितीचे अध्यक्ष कृष्णात पवार व पोलिस पाटील सुधीर कांबळे यांना दिली. हे भानामतीचे प्रकरण असल्याचे लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी तातडीने अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे व विनोद मोहिते यांना माहिती दिली.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते व ग्रामस्थांनी बांधून ठेवलेली गाठोडी सोडली असता त्यामध्ये नारळ, लोखंडी दाभण, बाहुली व मुलींची छायाचित्रे आढळली. या छायाचित्रांवर लोखंडी दाभणाने छिद्र पाडले होते. पाचपैकी एका गाठोड्यात एका मुलाचा व मुलीचा फाेटाे हाेता. हा प्रकार प्रेम प्रकरणातून एखाद्या माथेफिरूने केल्या असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.
स्मशानभूमीतील भानामतीचा प्रकार पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारा आहे. मुलांचे तसेच मुलींची छायाचित्रे त्यामध्ये आढळल्याने हे प्रकरण गंभीर आहे. पोलिसांनी तातडीने याप्रकरणी तपास करून प्रकरणाचा छडा लावावा. - कृष्णात पवार, तंटामुक्त ग्राम समिती अध्यक्ष, चिकुर्डे
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने कुरळप पोलिसांना संबंधितावर जादूटोणाविराेधी कायद्याअंतर्गत कडक कारवाई करावी याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. - संजय बनसोडे, प्रधान सचिव, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती