पलूस, कडेगावात ‘भारती’चे कोविड हेल्थ सेंटर सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:27 AM2021-04-16T04:27:02+5:302021-04-16T04:27:02+5:30
कडेगाव : कडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात ३० ऑक्सिजन बेडचे कोविड हेल्थ सेंटर सुरू आहे. आता चिंचणीच्या ग्रामीण रुग्णालयातही शुक्रवारपासून ...
कडेगाव : कडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात ३० ऑक्सिजन बेडचे कोविड हेल्थ सेंटर सुरू आहे. आता चिंचणीच्या ग्रामीण रुग्णालयातही शुक्रवारपासून ३० बेडचे कोविड हेल्थ सेंटर सुरू होत आहे. कडेगाव येथे आणि पलूसपासून जवळच असलेल्या तुरची फाटा येथे
भारती हॉस्पिटलचे कोविड हेल्थ सेंटर सुरू करणार आहे, अशी माहिती सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी गुरुवारी दिली.
मोहित्यांचे वडगाव (ता. कडेगाव) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला कदम यांनी भेट दिली व लसीकरण मोहिमेची पाहणी केली. यावेळी
पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
कदम म्हणाले की, कडेगाव व तुरची फाटा येथे भारती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्यावतीने सुरू
होत असलेले कोविड हेल्थ सेंटर प्राथमिक टप्प्यावरील कोविड सेंटर नसून
प्रत्येकी २५ ऑक्सिजन बेड, पाच व्हेंटिलेटर, मॉनिटरिंग, स्क्रीनिंग, एक्स रे, पूर्णतः प्रशिक्षित स्टाफ, लिक्विड ऑक्सिजन प्लांट यासारख्या अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. पलूस व कडेगाव या दोन्ही तालुक्यांतील लोकांना आरोग्य सेवा व उपचार सुविधा पुरविण्यासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने लागेल ती मदत केली जाईल, लोकांनी घाबरून जाऊ नये.
यावेळी सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम, प्रांताधिकारी गणेश मरकड, तहसीलदार डॉ. शैलजा पाटील, मालन मोहिते, सरपंच विजय मोहिते, डॉ. सागर जाधव, पी. सी. जाधव, प्रा. श्रीकृष्ण मोहिते उपस्थित होते.