भाष्टेवस्ती, कोकणेवाडी भीतीच्या छायेखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:28 AM2021-03-23T04:28:38+5:302021-03-23T04:28:38+5:30
विकास शहा शिराळा : तालुक्यातील चांदोली परिसरातील आरळापैकी भाष्टेवस्ती तसेच कोकणेवाडी भीतीच्या छायेखाली वावरत आहे. वाडीलगतच्या डोंगरांना भेगा पडून ...
विकास शहा
शिराळा : तालुक्यातील चांदोली परिसरातील आरळापैकी भाष्टेवस्ती तसेच कोकणेवाडी भीतीच्या छायेखाली वावरत आहे. वाडीलगतच्या डोंगरांना भेगा पडून ते खचू लागले आहेत. भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची पाहणी केली असून, कोकणेवाडीतील डोंगर केव्हाही ढासळू शकतो, असा निष्कर्ष काढला होता. त्यामुळे माळीणसारखी दुर्घटना घडण्याआधी येथील ११ कुटुंबांचे तातडीने स्थलांतर करणे आवश्यक आहे.
या दोन ठिकाणची माहिती मिळाल्यानंतर गतवर्षी तहसीलदार गणेश शिंदे यांनी खचलेल्या डोंगराची पाहणी केली होती. त्यावेळी तेथील परिस्थिती व ग्रामस्थांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. त्यांनी तातडीने भूवैज्ञानिकांना बोलविण्याचा निर्णय घेतला होता.
तहसीलदार शिंदे, वरिष्ठ भूवैज्ञानिक दिवाकर धोटे, कनिष्ठ भूवैज्ञानिक जयंत मिसाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कदम, चरण मंडल अधिकारी पी. पी. जाधव, तलाठी एम. बी. शिरस यांनी या परिसराची पाहणी केली होती.
यावेळी भूवैज्ञानिक धोटे व मिसाळ यांनी भूस्तर भाग, भौगोलिक परिस्थिती, खडकाची रचना, पाण्याचा निचरा याची चार तास तपासणी केली. कोकणेवाडी डोंगर लाल मातीने (लॅटेराईट सॉईल) भरला आहे. दगडाची झीज झाली आहे. मुरूम मातीची धूप झाली आहे. हा थर जवळपास ३०० ते ४०० मीटर लांब, १०० मीटर रुंद आणि १० ते २० फूट खोल आहे. हा थर कठीण दगडापासून सुटलेला आहे. तसेच तेथील ओढ्यामुळे या डोंगराची झीज वेगाने होत आहे. ओढ्यातील पाण्यामुळे माती व मुरूम वाहून जात आहे. त्यामुळे अतिवृष्टी झाली की हा डोंगराचा भाग केव्हाही सुटू शकतो. हा भाग सुटल्यास डोंगर पायथ्याशी असलेल्या चार घरांना व शाळेस धोका आहे. भाष्टे वस्तीला डोंगरास पडलेल्या भेगामुळे धोका नाही, मात्र ही वस्ती दोन ओढ्यांच्या मध्ये असल्याने पाणीपातळी वाढल्यास संपर्क तुटू शकतो, असा निष्कर्ष भूवैज्ञानिकांनी काढला होता.
भाष्टेवस्ती येथे दोन ओढ्यांच्या मध्ये सात, तर कोकणेवाडीत चार घरे आहेत. या कुटुंबांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणे आवश्यक आहे. या दोन्ही वस्त्या सध्या भीतीच्या छायेखाली आहेत.
कोट
कुटुंबांचे स्थलांतर करण्याच्या दृष्टीने सर्व पाहणी करण्यात आली असून, याबाबत अहवाल तयार करून वरिष्ठ कार्यालयास पाठवून कायमस्वरूपी स्थलांतर करण्यासाठी कार्यवाही सुरू आहे.
- गणेश शिंदे
तहसीलदार, शिराळा