दीपाली सय्यद यांच्याकडून बोगस सामुदायिक विवाह - भाऊसाहेब शिंदे
By अविनाश कोळी | Published: December 7, 2022 08:11 PM2022-12-07T20:11:33+5:302022-12-07T20:12:10+5:30
दीपाली सय्यद यांच्याकडून बोगस सामुदायिक विवाह केला असल्याची टीका भाऊसाहेब शिंदे यांनी केली.
सांगली : अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी ट्रस्टच्या माध्यमातून बोगस सामुदायिक विवाह लावून दिले. ज्यांना अपत्ये झालीत, अशा लोकांचे विवाह लावून त्यांनी फसवणूक केली. ट्रस्टचे पैसेही हडप केले, असा आरोप सय्यद यांचे माजी स्वीय साहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. ते म्हणाले, अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी लग्न झालेल्या जोडप्यांचा पुन्हा सामुदायिक विवाह सोहळा केला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत लग्नात दिलेले सोनेदेखील बनावट आहे. राज्यपाल कोश्यारी आणि दीपाली सय्यद यांचे साटेलोटे आहे.
दीपाली-भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी हजारो कोटींचे वाटप केले. ऑडिट रिपोर्ट जेव्हा माझ्या हातात आले तेव्हा या चॅरिटेबल ट्रस्टच्या खात्यात ९,१८२ रुपये आढळले. त्यामुळे बाकीची रक्कम दीपाली यांनी कोठून आणली आणि कोठे दिली, याची चौकशी गुन्हे आर्थिक शाखेने करावी. ९ सप्टेंबर २०२१ रोजी राज्यपाल कोश्यारी यांच्या उपस्थितीत सय्यद यांनी सांगलीत बोगस लग्ने लावली. यातील एका दाम्पत्याला २०१८ मध्ये मूलही झाले होते. तरीही ट्रस्टअंतर्गत त्यांचे लग्न लावण्यात आले. ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी हजारो कोटींचे वाटप केले. ते म्हणाले की, राज्यपाल कोश्यारींना तातडीने पदावरून हटवावे आणि आर्थिक गुन्हे शाखेने या ट्रस्टची चौकशी करावी. मागणीची दखल घेतली नाही, तर उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आत्मदहन करू.