सांगली: आष्ट्याच्या 'भावई'त जोगण्या उत्साहात, भाविकांची माेठी गर्दी; आज मुखवट्यांचे युद्ध रंगणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 02:26 PM2022-06-29T14:26:11+5:302022-06-29T14:27:06+5:30
नगारे, छत्र्या, अशा लवाजम्यासह खेळगडी, मानकरी भाविकांबराेबर जाेगणी परंपरेनुसार ठराविक मार्गाने रवाना झाली.
आष्टा : आष्टा येथील श्री चौंडेश्वरी देवीच्या भावई उत्सवात मंगळवारी देवीने आपल्या सैनिक सहकाऱ्यांसह जोगण्याच्या रूपात दैत्याचा शोध घेतला. सायंकाळी लोट ही उत्साहात झाला. यावेळी भाविकांनी माेठी गर्दी केली होती. आज-बुधवारी मखोटे व आरगडी यांच्यात युद्ध रंगणार आहे.
श्री चौंडेश्वरी देवीच्या भावई उत्सवात मंगळवारी चौथ्या दिवशी स्वतः देवी आपल्या सैनिक सहकाऱ्यांसोबत दैत्याच्या शोधासाठी जोगण्याच्या रूपात बाहेर पडली. यामध्ये दमामे-पाटील म्हणजेच भद जोगणी व दोन सुतार जोगणी मंदिरात रंगून बाहेर पडले. यानंतर कुंभार वाड्यातून रंगून गाव जोगणी यामध्ये सामील झाली.
या जोगण्याची वेशभूषा पारंपरिक लालभडक रंगाची होती. याच्या जोगण्यांपैकी तीन जोगण्यांच्या उजव्या हातात तलवार व डाव्या हातात वाटी होती, तर भद जोगणीच्या हातात मातीची कळशी, म्हणजेच भद होते. जोगण्याच्या हातात, दंडात व पायामध्ये भाविकांनी दिलेले दोरे बांधले होते. हे दोरे भाविक, भक्तगण श्रद्धेने गळ्यात, हातात बांधतात. जाेगणीपुढे रणशिंग, चवंडके, कैताळ ही वाद्ये विशिष्ट लयीत वाजवली जात हाेती.
नगारे, छत्र्या, अशा लवाजम्यासह खेळगडी, मानकरी भाविकांबराेबर जाेगणी परंपरेनुसार ठराविक मार्गाने रवाना झाली. मानकऱ्यांच्या घरी पूजा करण्यात आल्या. प्रथम पूजेचा मान मातंग समाजाला असून त्यानंतर परीट, थोरात, पाटील, कुलकर्णी व महाजन यांच्या पूजा झाल्या. जोगण्यांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. विविध ठिकाणी जोगण्यांची पूजा करण्यात आली. भाविकांना विविध मंडळांनी दूध, खडीसाखर यासह प्रसादाचे वाटप केले.
सायंकाळी नगरपालिकेसमोर ‘लोट’ खेळ झाला. जोगण्या रुपात देवीने दैत्याचा शोध घेतला. परंतु दैत्य समोर न येता हुलकावणी देत हाेता. तो तळ्यात लपून बसलेला आढळल्यानंतर देवीने तलावातील पाणी मडक्याने बाहेर काढून दैत्यास बाहेर येण्यास भाग पाडले. दैत्याला ‘मडक्यासारखे चिरडून टाकीन’ असे आव्हान देऊन लोट फोडले.
लिंबाच्या तोरणाभोवती जमले खेळगडी
प्रतीकात्मक रूपात गाव जोगणी होणारे खेळगडी कुंभार मडक्यात पाणी घेऊन गांधी चौकात बांधलेल्या लिंबाच्या तोरणा भोवती जमले. खेळगडी, मानकरी व भाविकांच्या अंगावर पाणी उडवून पाच फेऱ्या काढल्या. शेवटच्या फेरीत हातातील मडके उंच फेकून दिले. यावेळी दैत्य रूपातील दमामे-पाटील खेळगडी तोरणाच्या मध्यभागी घोंगडी पांघरूण बसले होते. पाचव्या फेरी वेळी ते पळून गेले. हा खेळ पाहण्यासाठी भाविकांनी हजारोंच्या संख्येने गर्दी केली होती.