Sangli: सुहास जोशी यांना यंदाचे भावे गौरव पदक जाहीर, शरद कराळे यांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 04:41 PM2024-10-08T16:41:55+5:302024-10-08T16:42:38+5:30

५ नोव्हेंबरला रंगभूमीदिनी कार्यक्रम

Bhave Gaurav Medal was announced to Suhas Joshi, informed by Sharad Karale | Sangli: सुहास जोशी यांना यंदाचे भावे गौरव पदक जाहीर, शरद कराळे यांनी दिली माहिती

Sangli: सुहास जोशी यांना यंदाचे भावे गौरव पदक जाहीर, शरद कराळे यांनी दिली माहिती

सांगली : अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समिती सांगलीतर्फे मराठी रंगभूमीवरील मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार यंदा अभिनेत्री सुहास जोशी यांना दिला जाणार आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी दिली.

अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती, सांगली ही संस्था ऐंशी वर्षे नाट्यक्षेत्रात कार्यरत आहे. संस्थेतर्फे ५ नोव्हेंबरला रंगभूमी दिन विविध उपक्रमांनी साजरा केला जातो. याच दिवशी नाटककार विष्णुदास भावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नाट्यक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रंगकर्मीस विष्णुदास भावे गौरव पदक देऊन सन्मानित केले जाते. ५ नोव्हेंबर रोजी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून सुहास जोशी यांना विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार दिला जाणार आहे. गौरवपदक, रोख रक्कम २५ हजार स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे गौरव पदकाचे स्वरूप आहे.

सुहास जोशी यांची व्यावसायिक अभिनयाची कारकीर्द विजया मेहता दिग्दर्शित आणि जयवंत दळवी लिखित ‘बॅरिस्टर’मध्ये १९७२ मध्ये झाली. सख्खे शेजारी, बॅरिस्टर आणि गोष्ट जन्मांतरीची ही त्यांची गाजलेली नाटके होत. काशीनाथ घाणेकर यांच्यासोबत ‘आनंदी गोपाळ’मध्ये त्या होत्या. गंभीर आणि विनोदी अशा दोन्ही प्रकारच्या भूमिका त्यांनी साकारल्या आहेत. बॅरिस्टरमधील त्यांची राधा, सई परांजपेंच्या सख्खे शेजारीमधील मध्यमवर्गीय गृहिणी या महत्त्वाच्या भूमिका होत. ऐंशीच्या दशकात तेंडुलकरांच्या ‘कन्यादान’ या नाटकात त्यांनी व्यक्तिरेखा साकारली. या नाटकात डॉ. श्रीराम लागू प्रमुख भूमिकेत होते. सुहास जोशींनी श्रीराम लागू यांच्याबरोबर केलेली अग्निपंख, नटसम्राट, एकच प्याला ही नाटके चांगलीच गाजली.

मराठी चित्रपटांमधल्या ‘तू तिथे मी’ मधील अभिनयासाठी उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून त्यांना चार संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत. अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

पत्रकार परिषदेत विलास गुप्ते, विनायक केळकर, जगदीश कराळे, डॉ. भास्कर ताम्हनकर, भालचंद्र चितळे आदी उपस्थित होते.

तारा भवाळकर यांचा विशेष सन्मान

दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या तारा भवाळकर यांचाही रंगभूमीदिनी विशेष सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रमास शंभराव्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांची प्रमुख उपस्थिती आहे. त्यांच्या हस्ते हा सोहळा होणार आहे.

Web Title: Bhave Gaurav Medal was announced to Suhas Joshi, informed by Sharad Karale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली