भिलवडी बाजारात ‘कृष्णे’च्या पुराचे ठाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 11:09 PM2019-08-04T23:09:22+5:302019-08-04T23:09:25+5:30
भिलवडी : भिलवडी (ता. पलूस) येथे रविवारी पहाटे कृष्णा नदीवरील पूल पाण्याखाली गेला. त्याचबरोबर भिलवडी बाजारपेठेसह, मौलानानगर परिसरात पुराचे ...
भिलवडी : भिलवडी (ता. पलूस) येथे रविवारी पहाटे कृष्णा नदीवरील पूल पाण्याखाली गेला. त्याचबरोबर भिलवडी बाजारपेठेसह, मौलानानगर परिसरात पुराचे पाणी घुसले. दिवसभर सुरू असलेला संततधार पाऊस आणि पुराची धास्ती यामुळे कृष्णाकाठच्या गावातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
भिलवडी- अंकलखोपदरम्यानचा पूल बुडाल्याने कोल्हापूर-तासगाव, इस्लामपूर-तासगाव, सांगली ही वाहतूक पूर्णपणे बंद झाली. भिलवडी-अंकलखोप या गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच भिलवडी ते धनगाव रस्त्यावर पाणी आल्याने श्रीक्षेत्र भुवनेश्वरवाडीतील नागरिकांचा पूर्णपणे संपर्क तुटला आहे. चोपडेवाडी, सुखवाडी या गावातील ओढ्यांमधून पुराचे पाणी शिरल्याने या गावांचा भिलवडी व परिसरातील गावांशी असणारा संपर्क तुटला आहे. भिलवडी-सरळी पुलाच्या बाजूस असणाऱ्या मौलानानगर वस्तीमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. येथील शंभरावर कुटुंबांचे सेकंडरी स्कूल, भिलवडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माळवाडी, भारती विद्यापीठ, खंडोबाचीवाडी या शाळांच्या इमारतीमध्ये स्थलांतर केले आहे. दरम्यान, रविवारी सकाळी सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, आ. डॉ. विश्वजित कदम, पलूसचे तहसीलदार राजेंद्र पोळ, जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र वाळवेकर, भिलवडीचे सरपंच विजयकुमार चोपडे यांनी पूरग्रस्त भागास तसेच नागरिकांचे स्थलांतर केलेल्या शाळेच्या ठिकाणी भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. सायंकाळी भिलवडीच्या साखरवाडी, अण्णा भाऊ साठेनगर, पंचशीलनगरमधील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. धनगावमधील पूरग्रस्तांची जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत सोय करण्यात आली. बाजार मैदानात पाणी शिरल्याने भिलवडीच्या आठवडा बाजारास फटका बसला.