भीमराव माने यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र!
By Admin | Published: September 28, 2016 11:28 PM2016-09-28T23:28:25+5:302016-09-28T23:59:53+5:30
कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचे स्पष्टीकरण : मराठा समाजाचे काम करण्याचा मानस
सांगली : कोपर्डी (जि. अहमदनगर) येथील घटनेच्या निषेधार्थ आणि आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चे महाराष्ट्रात शांततेत निघत आहेत. या मागणीला शिवसेनेने पाठिंबा देण्याऐवजी त्यांचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकातील व्यंगचित्रातून मराठा समाजातील माता-भगिनींची बदनामी झाली आहे. याच्या निषेधार्थ शिवसेनेचा राजीनामा देत असल्याची माहिती कवठेपिरान (ता. मिरज) येथील जिल्हा परिषद सदस्य भीमराव माने यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, कोपर्डी येथील आमच्या भगिनीवर अत्याचार करून तिचा खून केला गेला. या घटनेमुळे मराठा समाजामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. या खुनातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी आहे. याचबरोबर शेतीला हमीभाव मिळत नाही. कधी नैसर्गिक संकटांमुळे, तर कधी शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी संकटात सापडत आहे. याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील मराठा समाजाला बसत आहे. यामुळे समाजातील तरुणांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणी आहे. यासह अन्य मागण्यांसाठी मराठा समाज शांततेच्या मार्गाने महाराष्ट्रभर मोर्चे काढत आहे. याला शिवसेनेने पाठिंबा देण्याची गरज होती. कारण, शिवसेनेमध्ये सर्वाधिक मराठा समाज असून, तो एकनिष्ठ आहे. पाठिंबा देण्याऐवजी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकातील व्यंगचित्रातून मराठा समाजाच्या माता-भगिनींचा अवमान झाला आहे. याचा आपल्याला मानसिक त्रास झाल्यामुळे शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले की, अन्य कोणत्याही पक्षात न जाता मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासह अन्य प्रश्नांसाठी पूर्णवेळ लढा देणार आहे. उध्दव ठाकरे यांना शिवसेना व्यवस्थित रहावी, असे वाटत असेल तर, मराठा समाजाच्या मागणीला पाठिंबा द्यावा. भाजपचे सरकार मराठा समाजाच्या मागण्या मान्य करणार नसेल, तर ठाकरे यांनी पाठिंबा काढून घ्यावा. (प्रतिनिधी)
सेनेतील अन्य मराठा पदाधिकाऱ्यांनी राजीनामे द्यावेत
मराठा समाजाची व्यंगचित्रातून बदनामी झाल्यानंतरही शिवसेना नेते माफी मागण्यास तयार नाहीत. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील शिवसेनेच्या विविध पदांवर असणाऱ्या मराठा समाजाच्या नेत्यांनी राजीनामे द्यावेत, असे आवाहनही भीमराव माने यांनी केले.