‘कौन बनेगा करोडपती’मध्ये भोंदूगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2021 04:00 PM2021-11-20T16:00:11+5:302021-11-20T16:01:02+5:30
सांगली : दूरचित्रवाहिनीवरील ‘ कौन बनेगा करोडपती’ कार्यक्रमाच्या मंगळवार व बुधवारच्या (दि. १६ व १७) भागात मुलांनी डोळ्यांवर पट्टी ...
सांगली : दूरचित्रवाहिनीवरील ‘कौन बनेगा करोडपती’ कार्यक्रमाच्या मंगळवार व बुधवारच्या (दि. १६ व १७) भागात मुलांनी डोळ्यांवर पट्टी बांधून वाचन केल्याचा प्रयोग दाखविण्यात आला. सूत्रसंचालक अमिताभ बच्चन यांच्यासमोर कथित चमत्कार दाखविल्याने अत्यंत चुकीचा आणि भोंदूगिरीचा संदेश समाजात गेल्याचा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला आहे.
अंनिसने याला आक्षेप घेताना यामागील हातचलाखीची चित्रफीत सादर केली आहे. डोळ्यांवर पट्टी बांधून वाचन करणारे अंनिसचे कार्यकर्ते दाखविले आहेत. ही भोंदूगिरी असून कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी दिलगिरी व्यक्त करण्याची मागणी केली आहे. बच्चन यांनी चूक दुरुस्त करावी आणि अवैज्ञानिक बाबींना कार्यक्रमात थारा देऊ नये, असे आवाहनही केले आहे.
अंनिसने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, डोळ्यांवर पट्टी बांधून मुलांचा मध्य मेंदू उद्दिपीत करण्याचे फॅड सर्वत्र पसरले आहे. याद्वारे त्यांचा बुद्ध्यांक तसेच स्मरणशक्ती वाढविण्याचे दावे केले जातात. याद्वारे डोळ्यांवर पट्टी बांधूनही स्पर्शाने किंवा वासाने गोष्टी ओळखता येतात, असा दावा जाहिरातींमधून केला जातो. प्रत्यक्षात मात्र हातचलाखीद्वारे फसवणूक केली जाते. मुलांच्या विकासाच्या अपेक्षेने पालक हजारो रुपये यासाठी खर्च करत आहेत.
अंनिसने स्पष्ट केले की, डोळ्यांवर पट्टी बांधली असता, नाक आणि डोळ्यांच्या मधील जागेतून गोष्टी ओळखता येतात. डोळे हाताने दाब देऊन घट्ट बंद केले, अथवा काळ्या काचेचा घट्ट चष्मा लावला, तर गोष्टी ओळखता येत नाहीत. भोवताली पूर्ण अंधार करून अथवा डोळ्यांच्या मागील बाजूस वस्तू धरली असताही मिड ब्रेन ॲक्टिव्हेशन प्रशिक्षित मुलांना त्या ओळखता येत नाहीत. अंधांना कितीही प्रशिक्षण दिले, तरी त्यांनाही ओळखता येत नाहीत.
मिड ब्रेन ॲक्टिव्हेशनच्या नावाखाली चमत्कारांचे दावे म्हणजे फसवणूक आहे, आधुनिक बुवाबाजीच आहे.
वाहिन्यांविरोधात तक्रार केली
अंनिसने सांगितले की, काही वाहिन्यांवरून प्रसारित होत असलेल्या मिड ब्रेन ॲक्टिव्हेशन कार्यक्रमांविरोधात प्रसार भारतीकडे तक्रार केली आहे. हे प्रकार जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत येऊ शकतात का, याचाही कायदेशीर सल्ला घेतला जात आहे.