भोपाळच्या कंपनीचा सांगलीत १३ लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 12:01 AM2019-02-25T00:01:06+5:302019-02-25T00:01:12+5:30
सांगली : गुंतवणूक रकमेला घसघशीत व्याज व तसेच साडेपाच वर्षांत दामदुप्पटचे आमिष दाखवून भोपाळ येथील ‘निर्मल इंम्प्राहोम कार्पोरेशन लिमिटेड’ ...
सांगली : गुंतवणूक रकमेला घसघशीत व्याज व तसेच साडेपाच वर्षांत दामदुप्पटचे आमिष दाखवून भोपाळ येथील ‘निर्मल इंम्प्राहोम कार्पोरेशन लिमिटेड’ या कंपनीने सांगली, मिरजेसह जिल्ह्यातही अनेकांना गंडा घातल्याचे रविवारी उघडकीस आले आहे. कंपनीत गुंतवणूक केलेल्या २५ जणांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची साडेतेरा लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी कंपनीच्या प्रमुखासह सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये कंपनीचा प्रमुख अभिषेक एस. चौहाण (रा. कालापिपाला), संचालक हरेश शर्मा, तुलसिंग चौधरी (त्रिकोडीया) निरंजन सक्सेना (भोपाळ), निर्मलादेवी चौहाण (कालापिपाल), लखन सोनी, (शहाजापूर, आंध्र प्रदेश) व व्यवस्थापक सुहास विजय गोकावे (सांगली) यांचा समावेश आहे. हे सर्वजण सध्या सीबीआयच्या कोठडीत अटकेत आहेत. संशयितांनी कोल्हापूर रस्त्यावरील एसटीच्या विभागीय कार्यालयाजवळ २०१२ मध्ये कंपनीचे कार्यालय सुरू केले होते. गुंतवणूक रकमेला व्याज तसेच साडेपाच वर्षांत दुप्पट रक्कम दिली जाईल, असे आमिष दाखविले. लोकांना पैसे गुंतविण्यास भाग पाडण्यासाठी त्यांनी सांगलीसह जिल्ह्यातील ग्रामीण भागात एजंटांची नियुक्ती केली. त्यांना घसघशीत कमिशनचे आमिष दाखविले. या आमिषाला बळी पडून एजंटांनी लोकांना कंपनीत पैसे भरण्यास भाग पाडले.
रविवारी २५ लोकांनी तक्रार केली. त्यांच्यावतीने उत्तम नामदेव बालटे (वय ३८, रा. विद्यानगर, आटपाडी) यांनी फिर्याद दिली आहे. बालटे हेही एजंट म्हणून काम करीत होते. त्यांनी स्वत:ही कंपनीत एक लाखाची रक्कम गुंतविली आहे. त्यांनी सांगली, जत, शिराळा, आटपाडी, मिरज व कर्नाटकातील अथणी येथील लोकांचे पैसे गोळा करून कंपनीत जमा केले आहेत. मध्यप्रदेश, छत्तीसगड, भुवनेश्वर, भोपाळ येथेही कंपनीचे कार्यालय सुरू होते. २०१५ मध्ये कंपनीने अचानक गाशा गुंडाळला. मध्यप्रदेशसह सर्वच ठिकाणी कंपनीच्या प्रमुखासह संचालकांविरुद्ध गुन्हे दाखल झाले. सीबीआयने संशयितांना अटक केली. २० मे २०१५ रोजी सांगलीतील कार्यालयही बंद झाले. सीबीआयने कंपनीच्या मालमत्तांवर टाच आणली आहे. गुंतवणूकदारांचे पैसे देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गुंतवणूकदारांनी तब्बल चार वर्षांनंतर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे.
गुंतवणूक पाच कोटींच्या घरात
जिल्ह्यातील सुमारे एक हजार लोकांनी निर्मल कंपनीत सुमारे पाच कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. प्रथमच सांगली शहर पोलीस ठाण्यात २५ जणांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. फसवणुकीचा आकडा मोठा असल्याने हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे जाण्याची शक्यता आहे. येत्या एक-दोन दिवसात कंपनीविरुद्ध तक्रारी दाखल होण्यास सुरुवात होणार आहे.