भुवनेश्वर शाळेत प्रभारी मुख्याध्यापकांची ‘गटारी’

By admin | Published: August 3, 2016 12:25 AM2016-08-03T00:25:15+5:302016-08-03T00:25:15+5:30

तडकाफडकी निलंबन : शिक्षणाधिकाऱ्यांच्या भेटीवेळी प्रकार; जि. प. शाळेतील बारा लेट लतीफ शिक्षकांची विनावेतन रजा

Bhubaneswar's school principal in charge of 'gutter' | भुवनेश्वर शाळेत प्रभारी मुख्याध्यापकांची ‘गटारी’

भुवनेश्वर शाळेत प्रभारी मुख्याध्यापकांची ‘गटारी’

Next

सांगली : भुवनेश्वर (ता. पलूस) येथील जिल्हा परिषद शाळेतील प्रभारी मुख्याध्यापक उत्तम रामचंद्र पाटील यांनी ‘गटारी’ साजरी करून मद्यधुंद अवस्थेत शाळेत हजेरी लावल्याचा प्रकार मंगळवारी शिक्षणाधिकारी नीशादेवी वाघमोडे यांच्या भेटीवेळी उजेडात आला. या प्रकारामुळे त्यांना निलंबित केल्याची माहितीही वाघमोडे यांनी दिली. दरम्यान, भिलवडी स्टेशन, भिलवडी, माळवाडी (ता. पलूस) आणि खरशिंग (ता. कवठेमहांकाळ) या जिल्हा परिषद शाळेतील बारा शिक्षक उशिरा आल्याने शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर बिनपगारी रजेची कारवाई केली आहे.
शिक्षणाची गुणवत्ता ढासळली असून, शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याच्या जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी होत्या. त्यानुसार शिक्षणाधिकारी नीशादेवी वाघमोडे यांनी दोन विस्तार अधिकाऱ्यांसह मंगळवारी विविध शाळांना भेटी दिल्या. दुपारी भुवनेश्वर जिल्हा परिषद शाळेस त्यांनी भेट दिली. ही शाळा पहिली ते चौथीपर्यंत असून, प्रभारी मुख्याध्यापकासह अन्य एक शिक्षक कार्यरत आहे; पण तेथे प्रभारी मुख्याध्यापक उत्तम पाटील जागेवर नसल्याचे निदर्शनास आले. यावेळी शिक्षणाधिकाऱ्यांनी, त्यांच्याबद्दल एका शिक्षकाकडे विचारणा केली.
थोड्याच वेळात प्रभारी मुख्याध्यापक पाटील शाळेत हजर झाले. पण, ते हलत, डुलतच आले. शिक्षणाधिकाऱ्यांनी ‘तुम्ही कुठे गेला होता?’, अशी विचारणा केल्यानंतर ‘विद्यार्थी शोधण्यासाठी गेलो होतो’, असे उत्तर पाटील यांनी दिले. ‘तुमच्या तोंडाचा वास का येतो.?’, असे शिक्षणाधिकाऱ्यांनी विचारले असता, ‘मॅडम, आज गटारी नाही का?’ विद्यार्थ्याच्या घरीच जेवण करून आलो. पालकाने आग्रह केला, म्हणून थोडी घेतली’, असे अजब उत्तर त्यांनी दिले. शिक्षणाधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारताच पाटील यांनी आत्महत्येची धमकी दिली. म्हणून शिक्षणाधिकाऱ्यांनी लगेच पोलिस बंदोबस्त मागवून घेतला. पहिली ते तिसरीच्या वर्गात विद्यार्थीच नाहीत. चौथीमध्ये एक विद्यार्थी आणि दोन शिक्षक असूनही त्या विद्यार्थ्यास मराठी वाचता येत नाही.
गणित आणि इंग्रजी विषयामध्येही तो कच्चा आहे. एवढेच नव्हे, तर त्या विद्यार्थ्यानेही, ‘मला गणित आणि इंग्रजी जमत नाही’, अशी शिक्षणाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली. या सर्व प्रकारामुळे पाटील यांच्यावर जिल्हा परिषद प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली. भिलवडी स्टेशन जिल्हा परिषद शाळेला सकाळी १०.२० वाजता शिक्षणाधिकारी वाघमोडे यांनी भेट दिली. येथे पहिली ते सातवीपर्यंत शाळा असून, सात शिक्षक कार्यरत आहेत. यापैकी सकाळी साडेदहा वाजेपर्यंत दोनच शिक्षक उपस्थित होते. उर्वरित प्रभारी मुख्याध्यापिका लैलाबी वांगकर, शिक्षिका राजश्री मोकाशी, हसिना शेख, मंदाकिनी पवार, प्रसाद कुलकर्णी उशिरा आले. माळवाडी जिल्हा परिषद शाळा पहिली ते सातवीपर्यंत असून, आठ शिक्षक कार्यरत आहेत. त्यापैकी मंगळवारी शिक्षिका सुलोचना सागरे, राजश्री हजारे, सुनीता उंडे गैरहजर होते. भिलवडी जिल्हा परिषद शाळेत प्रभारी मुख्याध्यापक बाजीराव पाटील रजेचा अर्ज न देताच गैरहजर होते. दि. २५ जुलै २०१६ रोजी खरशिंग जिल्हा परिषद शाळेला भेट दिली होती, त्यावेळी नऊपैकी तीन शिक्षक गैरहजर होते. येथील सुप्रिया शिंदे, सुजाता वांडरे, आरती वांडरे या उशिरा शाळेत आल्या होत्या. या सर्व शिक्षकांची त्या दिवसाची बिनपगारी रजा केली आहे. तसेच यापुढे शाळेत उशिरा आल्यास प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा इशारा शिक्षणाधिकारी वाघमोडे यांनी दिला आहे.
वेळेत गोलमाल
जिल्हा परिषद शाळांची वेळ सकाळी ११ ते सायंकाळी ५ अशी आहे. शिक्षकांनी शाळेत १०.३० पर्यंत दाखल झाले पाहिजे. पण, अनेक शिक्षकांनी शाळेत साडेनऊ व दहाची हजेरी नोंदविली आहे. शिक्षणाधिकारी वाघमोडे यांनी मंगळवारी पलूस तालुक्यातील काही शाळांना भेटी दिल्या. त्यावेळी बहुतांश हजेरी रजिस्टरला शिक्षक रोज सकाळी ९.३० ते सकाळी १० या वेळेत हजर होत असल्याचे दिसून आले. प्रत्यक्षात मंगळवारी बहुतांश शिक्षक सकाळी १०.३० पर्यंतही शाळेत उपस्थित नव्हते. यामुळे शाळेतील हजेरी रजिस्टरवर शिक्षक रोज वेळेचाच गोलमाल करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.
भुवनेश्वर शाळा बंद; विद्यार्थी, शिक्षकांची अन्यत्र सोय
भुवनेश्वर (ता. पलूस) जिल्हा परिषद शाळेत पहिली ते चौथी वर्गात एकच विद्यार्थी आहे. या विद्यार्थ्यासाठी दोन शिक्षक असूनही विद्यार्थ्याची गुणवत्ता वाढलेली नाही. शिक्षकही शाळेत कार्यरत नसल्यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने येथील शाळा बंद करून त्या विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची अन्य शाळेत सोय करण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: Bhubaneswar's school principal in charge of 'gutter'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.